कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आत्मजागरूकता आणि आत्मचिंतनाला महत्त्व द्या – एस.बी.केशव स्वामी यांचे प्रतिपादन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २८ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाच्या काळात केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून व्यक्तीने स्वतःची जाणीव, विचारक्षमता आणि आत्मचिंतन विकसित करणे आवश्यक आहे. व्यायाम, ध्यान, वाचन आणि चिंतन या चार गोष्टींचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास अधिक सजग, सकारात्मक आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगता येते, असे प्रतिपादन आध्यात्मिक लेखक आणि वैदिक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक एस. बी. केशव स्वामी यांनी केले.

    मुंबई पुस्तक महोत्सवातील ‘कृत्रिम बुद्धिमत्तेकडून जागृत बुद्धिमत्तेकडे’ (From Artificial Intelligence to Awakened Intelligence) या विषयावर आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते.  रायन फ्रीडमन यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांनाही दोघांनी उत्तरे दिली.

    एस. बी. केशव स्वामी यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून माहिती व्यवस्थापन विषयात पदवी घेतल्यानंतर वयाच्या २१व्या वर्षी संन्यस्त जीवन स्वीकारले. वैदिक तत्त्वज्ञान आणि संस्कृत ग्रंथांचा २५ वर्षांहून अधिक काळ अभ्यास केलेल्या स्वामी यांनी भगवद्गीतेवर आधारित दहा हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच आध्यात्मिक जीवनशैली, वैदिक तत्त्वज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर ५० हून अधिक अभ्यासक्रम विकसित केले असून, ते आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करतात.

    यावेळी त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘१५-१५-१५-१५’ हे सूत्र मांडले. दिवसातील पहिली १५ मिनिटे शारीरिक हालचालींसाठी, पुढील १५ मिनिटे ध्यानासाठी, त्यानंतरची १५ मिनिटे वाचनासाठी आणि शेवटची १५ मिनिटे आत्मचिंतनासाठी द्यावीत, असे त्यांनी सांगितले. सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल फोन पाहण्याऐवजी स्वतःसाठी एक तास राखून ठेवावा. या वेळेत व्यायाम, ध्यान, वाचन आणि चिंतन केल्यास दिवसाची सुरुवात अधिक सजगतेने करता येईल. वाचनातून मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या जीवनाशी संबंध जोडून आपण अधिक चांगली व्यक्ती कशी बनू शकतो आणि अधिक उद्दिष्टपूर्ण जीवन कसे जगू शकतो, यावर विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

    ‘द कॉन्शसनेस जिम’ ही केवळ संकल्पना नसून स्वतःमधील जागरूकता वाढविण्याचा दैनंदिन सराव आहे. जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय व्यक्तीला स्वतःच्या अंतरंगातील आवाज ऐकण्यास आणि जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात, असेही त्यांनी सांगितले.

    ‘द कॉन्शसनेस जिम’च्या माध्यमातून आधुनिक आरोग्य आणि कल्याण क्षेत्रातील व्यावसायिक दृष्टिकोनापलीकडे जाऊन आत्मजागरूकतेच्या मूळ संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासारख्या प्राचीन संस्कृतीने हजारो वर्षांपासून जतन केलेल्या ज्ञानपरंपरेचा सन्मान करणे आणि हे ज्ञान आधुनिक जीवनाशी जोडणे आवश्यक आहे. प्राचीन ज्ञानाचा आधार घेत वर्तमानकाळातील आव्हानांना सामोरे जाण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    या संवाद सत्रातून विद्यार्थ्यांना आत्मविकास, आत्मचिंतन, भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातील मानवी सजगतेचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.

    00000

    - Advertisement -