Home बातम्या ऐतिहासिक केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, दि. 9 : राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्त्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली भेटीवर असून त्यांनी राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. याविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील  सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील व यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे, म्हणूनच सरकार स्थापनेनंतर शिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या सदिच्छा भेटी घेण्यासाठी उपमुख्यमंत्र्यासह दिल्लीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राच्या विकासाबाबतचा दृष्टीकोन समजून घेऊन केंद्राच्या सहकार्याने राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी रात्री केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची  6 ए, कृष्ण मेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.  आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तर दुपारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. तत्पूर्वी, त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची 17 अकबर रोड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

                                                  000