नाशिक, दि.६ जुलै, २०२२ (जिमाका वृत्तसेवा): – जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरीय हेल्प लाईन क्रमांकासारखे जिल्हास्तरीय हेल्पलाईन क्रमांकाची सुविधा प्रत्येक विभागाने निर्माण करावी. तसेच त्या क्रमांकावर २४/७ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून जनतेच्या तक्रारी व शंकांचे निरसन करण्यासाठी यंत्रणा उभारून कामकाजाची दिशा ठरवून प्रत्येक विभागाने ॲक्शन मोड वर काम करावे. तसेच केंद्राच्या योजनांचा लाभ जनतेला होण्यासाठी या योजनांची व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामासंदर्भात सर्वसाधारण आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, सहायक जिल्हाधिकारी विकास मीना, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, उत्कर्ष दुधडीया, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि. प) डॉ.कपिल आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार पुढे म्हणाल्या की, वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ट्रॅक सिस्टीम राबविण्यात यावी. जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, ग्रामीण रुग्णालयांनी जास्तीत जास्त ट्रेसिंग व टेस्टिंगवर भर द्यावा. कोरोना लसीकरणात मालेगाव शहराची टक्केवारी खूप कमी आहे. पहिला डोस घेणारे ६०.८ टक्के तर दुसरा डोस घेणारे २५.४ टक्के इतकेच आहे. त्यामुळे मालेगाव शहरात जनजागृती मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी प्रयत्न करावे. मालेगावतील खाजगी रुग्णालयांना प्रिव्हेन्श डोस उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच ‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका, ग्रामीण रुग्णालयांनी नागरिकांच्या लसीकरणबरोबर मुलांच्या लसीकरणासही गती द्यावी.
ग्रामीण रुग्णालय सक्षम करावे
प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे येत असतात. परंतु यामध्ये रुग्णाला बराच त्रास सहन करावा लागतो व जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजावर ताण येतो. त्यामुळे रुग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सक्षम करावे. ग्रामीण रुग्णालय सक्षम झाल्यास माता व बालमृत्यूचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल. तसेच माता-बालमृत्यु कमी होण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली कायान्वित करावी. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात यावे व संबंधित डॉक्टरांच्या तसेच कर्मचारी यांच्या कामकाजाचे ऑडीट करावे. केंद्राच्या आरोग्य विषयक योजनांच्या माहितीचे फलक प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात लावावेत, अशा सूचना डॉ.पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यासाठी गावपातळीवर मोहिम, शिबिरे राबवावित, जेणेकरुन प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ मिळेल. तसेच गावागावात योगासनांचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे. ई-संजीवनी टेलीमेडिसीन योजनेचाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी आढावा घेतला.
केंद्राच्या ‘वन नेशन वन रेशन’योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी
केंद्राच्या ‘वन नेशन वन रेशन’ योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक रेशन दुकानात, गावागावत योजनेची माहिती देणारे फलक लावण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत प्राधान्य कुंटूंब योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रेशन उपलब्ध करुन द्यावे. अन्न धान्याचा पुरवठा करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या रेशन दुकानदारांवर धडक मोहिम राबवून कार्यवाही करण्यात यावी. पुरवठा झालेल्या धान्याची तपासणी करुन चांगल्या प्रतीची अन्नधान्य नागरिकांना मिळेल याची दक्षता घ्यावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी सांगितले.
महावितरण विभागाने राज्य व केंद्राच्या योजना एकत्रितपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावे. आदिवासी महिलांसाठी महिला सशक्तीकरण योजना, आदिवासी शिक्षा योजना, राष्ट्रीय फेलोशिप योजना, राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना आणि बचतगटांसाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्राच्या योजनांची माहिती घेवून जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी.
देवगाव येथील ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ उपक्रम कौतुकास्पद
सुरगाणा तालुक्यातील देवगाव येथे राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत राबविण्यात येणारा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्याने त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या राष्ट्रीय बांबू मिशन उपक्रमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने कार्यशाळा तसेच शिबिरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी. तसेच वनविभागाच्या वनधन योजना वनबंधारे, उज्वल योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती करावी, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत एक दिवस निश्चित करून वृक्ष लागवड करण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेत सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन जन चळवळ उभारावी. दत्तक बालक योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांनी सहभाग वाढवावा तसेच पीएम केअर योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती मुलांना लाभ देण्यात आला आहे. याबाबतचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी घेतला.
‘एक दिवस शाळेसाठी’हा अभिनव उपक्रम राबवावा
ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन ‘एक दिवस शाळेसाठी’ हा अभिनव उपक्रम जिल्हास्तरावर राबवावा. या उपक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील मुलांना अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा व शिक्षणाचा उपयोग होईल. भविष्यात या मुलांना आपले करिअर घडविण्यासाठी मदत होईल, असा आशावाद, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांनी यावेळी व्यक्त केला.