मुंबई, दि. ४: महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म शंभर वर्षांपूर्वीच समजून घेत शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. आजही सहकार हेच ग्रामीण विकासाचे सर्वात प्रभावी साधन ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्ज व विकास पोहोचविण्यात सहकारी संस्थांची भूमिका निर्णायक ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था आणि पदाधिकाऱ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, आमदार चित्रा वाघ, आमदार अभिजित पाटील, आमदार संजय भेंडे, राज्य सहकारी संघाचे संचालक शिवाजीराव नलावडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, प्रकाश दरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म पूर्वीच ओळखले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने सहकार चळवळीचे मर्म खूप पूर्वी ओळखले होते. सव्वाशे वर्षांपूर्वीपासून सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यानंतरच्या काळात सहकारी पतपेढी, बँकिंग, कृषी, डेअरी, गृहनिर्माण, मार्केटिंग अशा विविध क्षेत्रांत सहकारी संस्थांची उभारणी झाली. पहिली सहकारी पतपेढी १९०४ मध्ये उभी राहिली, तर १९११ मध्ये शिखर बँकेची स्थापना झाली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील, वैकुंठभाई मेहता यांसारख्या अग्रणी व्यक्तींनी सहकाराला दिलेल्या दिशा-निर्देशांचे स्मरण यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
आता सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत असून सहकाराचे सर्वाधिक व्यापक जाळे हे याच राज्यात आहे. सहकार क्षेत्राची खरी ताकद ओळखून ६ जुलै २०२१ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले, याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पूर्वी सहकाराला फक्त काही राज्यांपुरती मर्यादित चळवळ म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता सहकाराला राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पहिल्या केंद्रीय सहकार मंत्रिपदासाठी निवड झाल्याने सहकार क्षेत्राला दूरदृष्टी आणि अनुभव लाभला आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करून पुढील २० वर्षांत देशाच्या ‘जीडीपी’मध्ये सहकार क्षेत्राचा हिस्सा तीन पट वाढवण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. ६३ हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचे डिजिटायझेशन, पाच वर्षांत दोन लाख नवीन ‘पॅक्स’ उभारण्याचा निर्णय, नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड, नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड, भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आणि केंद्रीय सहकारिता विद्यापीठ अशा विविध उपक्रमांमुळे सहकार क्षेत्राला नवे बळ मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सहकारी साखर कारखान्यांचा १० हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा निर्णय, इथेनॉल आणि सीबीजी धोरणांमुळे साखर उद्योगाला मिळालेले संजीवनी याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. सहकारी संस्थांना ग्रामीण भागात १७ प्रकारची कामे खुली करून ‘एनसीडीसी’मार्फत अर्थसाहाय्याची सोय केल्याने सहकार संस्था या ग्रामीण परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
सहकारी बँकांची कामगिरी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही चांगली
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २१व्या शतकात सहकार जिवंत राहील का, कॉर्पोरेट क्षेत्राशी स्पर्धा करू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, प्रत्यक्षात सहकारी बँकांनी कॉर्पोरेट बँकांपेक्षाही चांगले काम करून दाखवले आहे. सहकारी संस्थांच्या वित्तीय प्रवेशामुळे विकास वेगाने घडत असून, महाराष्ट्रात शेवटच्या शेतकऱ्याला कर्ज पोहोचविण्याचे काम जिल्हा सहकारी बँका करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील मराठी माणसाचे घराचे स्वप्न स्वयं पुनर्विकासामुळे पूर्ण
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांपैकी ४० ते ४५ टक्के संस्था या सहकारी गृहनिर्माण संस्था असून हा घटक दीर्घकाळ उपेक्षित राहिला होता. मात्र, आमदार प्रवीण दरेकर यांच्या पाठपुराव्यामुळे सहकार कायद्यात गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र अध्याय तयार करण्यात आला आहे. या आधारावर स्वयं पुनर्विकास योजना तयार करून सहकारी सोसायट्यांना स्वतःच्या पुनर्विकासाचे अधिकार देण्यात आल्याने अनेक कुटुंबांचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील मराठी माणसाचे घराचे स्वप्न स्वयं पुनर्विकासामुळे पूर्ण होत असून ४०० चौरस फुटांवरून १००० चौरस फुटांमध्ये राहायला जाणारे सभासद पाहून होणारा आनंद अवर्णनीय आहे. विद्यमान प्रकल्पांना अर्थसाहाय्य वाढविण्यासाठी सहकारी बँकांनी हजारो पेंडिंग प्रकल्पांना मदत करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ‘युडीसीपीआर’मधील अडचणी दूर करून मुंबईबाहेरील सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही स्वयं पुनर्विकास प्रक्रियेत सामावून घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.
कॉर्पोरेट जगत सामान्य माणसाला धडकी भरवते. मात्र, गावातील सहकारी पतपेढी, सहकारी बँक सामान्य नागरिकांना आपली वाटते, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, लोकाभिमुखता आणि वित्तीय प्रवेश ही सहकाराची ताकद आहे. जिल्हा सहकारी बँकांचे संचालक लोकशाही प्रक्रियेतून निवडले जात असल्याने त्यांची सामान्य शेतकऱ्याशी बांधिलकी राहते. व्यावसायिक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनीही अशी बांधिलकी जपावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर म्हणाले, सहकार आणि लोकशाही या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानात सहकार क्षेत्राचा विशेष उल्लेख लोकशाही बळकटीसाठी महत्त्वाचा आहे. विकास प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग सहकार चळवळीतूनच व्यापक पद्धतीने शक्य होतो, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
सहकार विषयावर लिहिणाऱ्या लेखकांनाही यापुढे राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्कारांत समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत सहकार क्षेत्रातील साहित्य निर्मिती आणि संस्थात्मक कामांना राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे डॉ. सामंत यांनी सांगितले.
सहकार चळवळ राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन सहकार व गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुरस्कार विजेत्यांना केले. देशातील सहकार चळवळीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून सहकारातूनच समाजाची समृद्धी साध्य होऊ शकते, असे मंत्री डॉ. भोयर यांनी नमूद केले.
सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी शिक्षण निधी तातडीने सुरू करून प्रलंबित धोरणांची अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव –
पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रांतील सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना ‘सहकार महर्षी पुरस्कार’, वारणा सहकार समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, भगिनी निवेदिता सहकारी बँक, पुणेच्या अध्यक्षा डॉ. रेवती पैठणकर यांना ‘सहकार रत्न पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार’, अण्णासाहेब सावंत नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शोभाताई सावंत यांना ‘महिला सहकार शक्ती पुरस्कार’ तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांना ‘सहकार विभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याचबरोबर विभागीय सहनिबंधक शहाजी पाटील, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील आणि जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांना ‘सहकार प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आणि चारकोप अभिलाषा गृहनिर्माण सहकारी संस्थेचे श्रीकांत कवठणकर यांना ‘सहकार नवोन्मेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेचे आमदार नामदेव उसेंडी यांना ‘सहकार ग्राम विकास पुरस्कार’ देण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्याधिकारी राजेंद्र सरकले यांना ‘सहकार बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अमरावती येथील शरदमाई विविध कार्यकारी संस्थेचे संजय सुणे, नंदुरबार येथील प्रकाशा विविध कार्यकारी संस्थेचे दिलीप पाटील आणि यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील श्रद्धेय आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी संस्थेचे सचिन देशमुख पारवेकर यांना ‘सहकार कृषी रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विजय उत्तमराव काळे आणि लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष गोकुळ तोताराम राजपूत यांना ‘दूध उत्पादक व सेवा सोसायटी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
याशिवाय सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ‘सहकार समाज सेवा पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे माजी अध्यक्ष अशोक जगताप यांना ‘सहकार नेतृत्व पुरस्कार’, ज्ञानदीप सहकारी पतसंस्थेचे व्ही. जी. पवार यांना ‘आदर्श सहकारी संस्था पुरस्कार’, गोराई सहकारी मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष ऑल्विन वसईकर यांना ‘सहकार उद्योग पुरस्कार’, दि मुंबई अन्नधान्य दल फेडरेशनचे अध्यक्ष दशरथ घनवट यांना ‘सहकार परिवर्तन पुरस्कार’ आणि मार्केटिंग फेडरेशन, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
००००






















WhatsApp