Home बातम्या ऐतिहासिक केंद्र पुरस्कृत योजनांचा जास्तीत जास्त निधी ठाणे जिल्ह्याला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्र पुरस्कृत योजनांचा जास्तीत जास्त निधी ठाणे जिल्ह्याला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

0
केंद्र पुरस्कृत योजनांचा जास्तीत जास्त निधी ठाणे जिल्ह्याला मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि. 22 (जिमाका) : केंद्र पुरस्कृत योजनांचा जास्तीत जास्त निधी ठाणे जिल्ह्याला मिळावा, यासाठी सर्व विभागानी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जनतेला व्हावा, यासाठी या योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन भवनात केंद्रीय राज्यमंत्री तथा समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार कुमार आयलानी, आमदार गणपत गायकवाड, आमदार गीता जैन, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उल्हासनगर महापालिका आयुक्त दयानिधी राजा, भिवंडी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, केंद्र पुरस्कृत योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. भविष्यातही ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी सर्व विभागानी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी. केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांची जनजागृती होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या योजनांमधून कल्याण डोंबिवलीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले. या सीसीटीव्हीमुळे गुन्हे उघडकीस येण्यास मोठी मदत होत असल्याचे समाधान आहे.

केंद्र पुरस्कृत योजनांची अमंलबजावणी, निधी वितरण, योजनांची सद्यःस्थिती, आतापर्यंत झालेले काम यांचा योजनानिहाय व यंत्रणानिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. ठाणे जिल्हापरिषद, जिल्हा नियोजन समिती, जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्यासह महावितरण, रेल्वे, म्हाडा, प्रदुषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन आदी विभागांचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्स डॉ. कैलास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदी यावेळी उपस्थित होते.