Home शहरे कोपरगावसह अनेक गावांना पुराचा तडाखा

कोपरगावसह अनेक गावांना पुराचा तडाखा

0

शिर्डीः गोदावरीला आलेल्या महापुराचा तडाखा नगरजिल्ह्यातील कोपरगावसह राहता, श्रीरामपूर आणि नेवासे तालुक्यातील नदी काठच्या गावांना बसला. अनेक भाग पुराच्या पाण्याने वेढले गेले. यामुळे घरांची पडझड होऊन गावे संपर्कहीन झाली. पूरपरिस्थितीमुळे या भागातील जनजीवन ठप्प झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील धरणे तुडुंब भरली. दारणा-गंगापूर धरण समूहातील सर्व सात धरणे ओसंडून वाहती झाल्याने गोदावरीला महापूर आला. त्याचा फटका नगर जिल्ह्यातील गोदावरी काठी असलेल्या कोपरगाव शहराला बसला. पावणे तीन लाखांहून अधिक क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. कोपरगावमध्ये रविवारी रात्रीपासून पाणी शिरले आहे. बस स्थानक, बाजारपेठ, तसेच प्रमुख भागात पाणी घुसून संपूर्ण शहर जलमय झाले. पाण्यामुळे कच्ची घरे पडली. पुराचा धोका ओळखून आमदार स्नेहलता कोल्हे तसेच आशुतोष काळे , तहसीलदार व नगर पालिका यांच्या यंत्रणेमार्फत नागरिकांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलविल्याने जीवितहानी टळली. 

हिंगणी, वारी, शिंगवे, पुणतांबा, नाहूर, खानापूर सरला बेट, भामठांन, कमालपूर, महांकाळ, वडगाव, रामपूर, नायगाव, जाफराबाद, मातुलठाण या गावात पुराचे पाणी घुसले. गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने दळणवळण थांबले. गोदेच्या पुरामुळे सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. कोपरगाव बस स्टँड पाण्याने वेढल्याने बस सेवा ठप्प झाली. 

नाशिकमधील धरण क्षेत्रात सोमवारी पावसाने उसंत दिल्याने धरणातील विसर्ग कमी झाला. रविवारी रात्री नांदूर माध्यमेश्वर येथून सुरू असलेला २ लाख ९१ हजारा क्यूसेक विसर्ग कमी करण्यात आला. सोमवार सायंकाळपर्यंत तो १ लाख ४० हजारांवर आला. त्यामुळे पाणी ओसरू लागले आहे. सध्या पूरस्थिती नियंत्रणात आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.