Home बातम्या ऐतिहासिक कोरा परिसरातील गावांच्या नागरिकांना आता मिळणार गावातच आरोग्य सुविधा- पालकमंत्री सुनील केदार

कोरा परिसरातील गावांच्या नागरिकांना आता मिळणार गावातच आरोग्य सुविधा- पालकमंत्री सुनील केदार

0
कोरा परिसरातील गावांच्या नागरिकांना आता मिळणार गावातच आरोग्य सुविधा- पालकमंत्री सुनील केदार

वर्धा, दि.5 (जिमाका) : कोरा ते नंदोरी रस्त्याच्या बांधकामाचे मागील महिण्यात भूमीपूजन करण्यात आले होते. आता या रस्त्याच्या बांधकामाला सुरवात झाली असून कोरा येथील नागरिकांना रस्त्याच्या सुविधेसोबत चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करुन लोकार्पण  करण्यात आले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे कोरा परिसरातील गावांच्या नागरिकांना आरोग्य सुविधेचा चांगला लाभ मिळणार असल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे नव्याने मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार समिर कुणावार, माजी आमदार अशोक शिंदे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, कोरा ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रोशन चौके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे आदी उपस्थित होते.

प्रत्येक नागरिकाला आवश्यक त्या प्रमाणात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे  शासनाचे कर्तव्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हयातील महिला व पुरुषांची भटकंती होऊ नये यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत पाणी टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून आराखडयांतर्गत प्रत्येकाला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक गाव पाणी टंचाईमुक्त होणार असल्याचे सुनील केदार म्हणाले.

कोरोना काळात आर्थिक व्यवस्था बंद पडलेली असतांना  शेतक-यासाठी असलेल्या विविध योजना,  कर्मचा-यांचे वेतन अविरत चालू ठेऊन  शासन आपल्या दारी हे ध्येय ठेऊन विकास कामे बंद पडू दिली नाही.  त्यासोबतच वर्धा जिल्हा कोरोना बाधिताची संख्या नियंत्रणात राखण्यात राज्यात अव्वल ठरला असल्याचे श्री. केंदार म्हणाले. आमदार समिर कुणावार यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका शासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी केली असतांना श्री. केंदार यांनी लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

विदर्भातील पहिली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुमजली असलेली इमारत असून जागेच्या उपलब्धतेमुळे दुमजली इमारत बांधून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले आहे. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील गावातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार असून या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन समिर कुणावार यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  करतांना डॉ. राज पराडकर यांनी कोरा परिसरातील 34 गावातील नागरिकांचा समावेश असणार असून या प्राथमिक आरोग्य केंद्रांर्तगत 5 उप आरोग्य केंद्र आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचा-याचे 15 पदे मंजूर करण्यात आले असून 12 पदे भरण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला  प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

                                                            000