Home शहरे पुणे कोरेगाव-भीमामध्ये अभिवादनासाठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

कोरेगाव-भीमामध्ये अभिवादनासाठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

0

पुणे : कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त आज विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम पार पडत आहे. आजचा कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासोबतच देशभरातून भीमसागर याठिकाणी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल होतोय. राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच याठिकाणी उपस्थित राहून विजयस्थंभाला अभिवादन केलं आहे.

आज बुधवारी अनेक मोठे नेते याठिकाणी येणार आहेत. यामध्ये नवनिर्वाचित मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचाही समावेश असणार आहे. यासोबतच स्थानिक आमदार, खासदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरेगाव-भीमा अभिवादन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.

या दिवसाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यासोबतच पोलीसांकडून 744 जणांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या पथकाने फेसबुकवरुन दोन पेजेस डिलीट केले आहेत. महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित करण्यात आली आहे.

दरम्यान बुधवारी परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुटी जाहीर करण्यात आली. यासोबतच आठवडा बाजारही बंद ठेवला जाणार आहे. पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विजस्तंभावर जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त येथे असेल. कोणताही गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून पोलीसांचे प्रत्येक हालचालींवर लक्ष असणार आहे.