'कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन – महासंवाद

'कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन – महासंवाद
- Advertisement -

  • जनतेच्या हितासाठी ‘जीथं विकास तिथं सर्वांनी एकत्रित या’ – खासदार, शाहू महाराज छत्रपती
  • कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू – पालकमंत्री, प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ०९ (जिमाका) :  कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. जिल्ह्यातील विविध १४ नामांकित संघटना एकत्र येत केलेल्या विचारमंथनामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

कोल्हापूरचा शाश्वत विकास साध्य करण्यासाठी, कोल्हापूरचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अबाधित राखून पुढिल पीढीला अपेक्षित कोल्हापूर बनविण्यासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’ या उपक्रमाची सुरूवात आज हॉटेल पॅव्हीलीयन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाली.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज छत्रपती, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहूल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अशोकराव माने, अति.जिलहाधिकारी संजय शिंदे, कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन, ॲड. सर्जेराव खोत यांच्यासह जिल्हयातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध १४ नामांकित संघटना यात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, शिरोली मॅन्यू. असोसिएशन, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले, गोकूळ शिरगांव मॅन्यू. असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, सी.आय.आय.साऊथ महाराष्ट्र, असोसिएशन ऑफ आर्कीटेक्ट अॅन्ड इंजिनिअर्स, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, क्रीडा प्रतिष्ठान, कोल्हापूर, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, क्रीडाई कोल्हापूर, आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर, आय.आय.एफ. कोल्हापूर चॅप्टर, कोल्हापूर चार्टर्ड अकौंटंट्स सोसायटी यांचा समावेश आहे. यासर्वांनी एकत्रित येत केलेल्या उपक्रमाचे कौतुक सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधींनी केले. यावेळी विविध विषयांवर बोलण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींना वेगवेगळे विषय देण्यात आले होते.

जनतेच्या हितासाठी जिथे विकास तिथे सर्वांनी एकत्रित या – खासदार, शाहू महाराज छत्रपती

शाश्वत विकासाला प्राधान्य देत जनतेच्या हितासाठी जीथं विकास तिथं सर्वांनी एकत्रित या असे आवाहन खासदार, शाहू महाराज छत्रपती यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमाचा मुख्य उद्देश कोल्हापूरचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून करणे हा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्या सूचनांचा प्रगतीपथ निश्चित करावा. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचाही सहभाग यात करण्याच्या सूचना केल्या.

कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

उद्योग आणि गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत कोल्हापूरच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू अशी ग्वाही पालकमंत्री, प्रकाश आबिटकर यांनी दिली. कोल्हापूर हे ऐतिहासिकदृष्ट्या व्यापार आणि उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. या पार्श्वभूमीवर लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी या चर्चासत्रात नमूद केले. कोल्हापूरमधील विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यावर भर देण्यात येणार असून नवीन स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांनी मिळून ठरविले तर कोल्हापूर फर्स्ट येण्यासाठी वेळ लागणार नाही. विकास आणि पर्यटन या महत्त्वाच्या दोन घटकांना पुढे घेवून जाण्यासाठी रस्ते हा प्रमुख घटक आहे. यासाठी स्थानिक दोन्ही आमदार व खासदार निश्चितच वेगाने निर्णय घेतील. कोल्हापूर मध्ये भौतिक सुविधांची वाढ, शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असून हद्दवाढ झाली तर आपल्याला अनेक मार्गाने अधिकचा निधी शासनाकडून आणता येईल. पुणे शहराने 27 वेळा हद्दवाढ केली आपण मात्र 1972 पासून एकदाही हद्दवाढ केली नाही. स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ यांना विश्वासात घेवून हद्दवाढ करण्याची प्रक्रिया राबवावी लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

मेडिकल हब, मेडिकल टुरीझम यावर बोलताना त्यांनी चेन्नई शहराचे उदाहरण देत कोल्हापूरमध्येही ती क्षमता असल्याचे सांगितले. जिल्ह्यात मी आणि मंत्री हसन मुश्रीफ आरोग्य विषयक महत्त्वाचे दोन विषय हाताळत आहे. यातून निश्चितच आरोग्य क्षेत्राला जिल्हयात गती दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्ह्यातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मालिकेतून, छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटातून घरोघरी पोहचला तसा महाराणी ताराबाई यांचा इतिहासही आपल्याला प्रत्येकापर्यंत पोहचवता येईल का याचे नियोजन करावे लागेल. राधानगरी अभयारण्यामध्ये ताडोबापेक्षा जास्त क्षमता आहे. त्याठिकाणी पहिल्या टप्प्यात रिसॉर्टसह सर्वांना राहता येईल अशा निवासाची व्यवस्था करावी लागेल. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर खंडपीठ, अद्ययावत क्रीडा संकुल यासह कोल्ड स्टोरेज याविषयावर विचार मांडले.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या कोल्हापूर फर्स्ट च्या 14 संघटनांचे आभार मानून आयोजित केलेल्या उपक्रमाला पुढे घेवून जाण्यासाठी सहकार्य राहील असे सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूरची क्षमता ओळखून राज्यातील पहिली शाश्वत विकास परिषद येथे घेतली. 252 कोटी रूपयांचे कन्व्हेंशन सेंटर मंजुर झाले यातील 50 कोटी रूपये बजेटमध्ये दिले असून लवकरच काम सुरू होईल. एमआरडीपी मधून 3200 कोटी रूपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे. उद्योगधंदे आणि विकासात वाढ होण्यासाठी शक्तिपीठ महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी हद्दवाढ, आयटी पार्क, रिंगरोड याबाबत विचार मांडले.

खासदार धनंजय महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थव्यवस्थेला सुदृढ करण्यासाठीच्या प्रक्रियेत कोल्हापूर मध्येही वचनपुर्ती या कोल्हापूर फर्स्टच्या उपक्रमातून होईल असे मत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गाचे पुर्वीचे 3200 कोटी रूपयांचे अंदाजपत्रक आता 6 हजार कोटींवर गेले असून येत्या अधिवेशनात जिल्ह्यातील तीनही खासदार याविषयी प्रयत्न करू. तसेच जिल्ह्यात इलेक्ट्रीकल हब, पर्यटन विकास, प्रत्येक तालुक्याचा औद्योगिक विकास, क्रीडा क्षेत्राचा विकास यासाठी आवश्यक प्रयत्न करू. यावेळी त्यांनी सीएसआर मधून उद्योगांनी पुढे येत क्रीडा क्षेत्राला बळ देण्यासाठी आवाहन केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सीएसआरची गरज असल्याचे ते म्हणाले. मागील काळात महत्त्वाच्या विषयांना सोडविण्यात यश आल्याचे सांगितले. यात बास्केट ब्रीज, शहरातील उड्डानपुल, विमानतळ विस्तार, ईबस यांचा समावेश आहे. येत्या काळात सर्व लोकप्रतिनिधी आपल्या सोबत असतील तसेच प्रत्येक विकास प्रक्रियेत मिळून योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

स्वागतपर भाषणात ॲड.सर्जेराव खोत यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे समन्वयक सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्ट उपक्रमाचा उद्देश सांगून संकल्पना मांडली. ते म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटन सर्कीट तयार करून पर्यटन विकासाला चालना देता येईल. तीर्थक्षेत्र विकासामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. यावेळी कोल्हापूर फर्स्ट लोगोचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. क्षितिजा ताशी यांनी केले तर आभार बाबासो कोंडेकर यांनी मानले. या विचारमंथनातून अनेक उपयुक्त सूचना समोर आल्या असून, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासन, नागरिक आणि खासगी क्षेत्राने एकत्रित प्रयत्न करावेत, असे ठरविण्यात आले. ‘कोल्हापूर फर्स्ट’ उपक्रमामुळे कोल्हापूरचा सर्वांगीण विकास वेगाने होईल आणि भविष्यात ते एक आदर्श शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

०००

- Advertisement -