मुंबई (दि. 28) – लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकास कामे पूर्ण करण्याचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखवला असून या समाधीस्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व परिसरातील अन्य कामांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून ९ कोटी ४० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज विभागाने जारी केला आहे.
राजर्षी शाहू महाराजांची जयंती नुकतीच (दि. 26 जून) रोजी राज्यभरात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांतूनच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्य व लौकिकास शोभून दिसेल असे काम त्यांच्या समाधी स्थळी करून दाखवू, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर येथील भाषणात धनंजय मुंडे यांनी याबाबत घोषणा केली होती, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त या नूतनीकरण, सुशोभीकरण कामास हाती घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली होती. त्यानुसार आज कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाचे नूतनीकरण, सुशोभीकरण व अन्य विकासकामांसाठी 9 कोटी 40 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याबद्दल कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.