Home ताज्या बातम्या कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – महासंवाद

कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – महासंवाद

0
कोल्हापूर विमानतळच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया – महासंवाद

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले.

कोल्हापूर विमानतळ येथे विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक कार्यकारी संचालक जे.टी. राधाकृष्णन, कार्यकारी संचालक (दिल्ली) जी.प्रभाकरन, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले,  कोल्हापूर हे राज्यात महत्त्वाचे शहर आहे. कोल्हापूरची प्रगती आणि विकास जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूर मधून विविध राज्यांना जोडणाऱ्या विमानसेवा अधिक प्रमाणात सुरु होणे आवश्यक आहे. या दृष्टीने विमानतळ विस्तारीकरणाची कामे दर्जेदार व जलदगतीने होणे गरजेचे आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या 64 एकर भूसंपादनाची प्रक्रिया जलद पूर्ण करा. पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या एचटी लाईनचे शिफ्टिंग, टर्मिनल बिल्डिंगचे डिझाईन करताना ग्रीन बिल्डिंग होण्यावर भर, कोल्हापूर-मुंबई विमान सेवा सुरु होणे, विमानतळ विस्तारीकरणांतर्गत नेर्ली- तामगाव रोडचे शिफ्टिंग ही कामे गतीने पूर्ण होण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशा सूचना करुन कोणत्याही परिस्थितीत टर्मिनल बिल्डिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर – मुंबई विमानसेवा 5 ऑक्टोबर पासून सुरु होत असल्याचे सांगून विमानतळ विस्तारीकरण काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले.

विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली. विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विमानतळ विस्तारीकरण कामाच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी विमानतळ विस्तारीकरण कामे, भूसंपादन प्रक्रिया, रन-वे, नाईट लँडिंग, देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरु करणे आदी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.

00000