कोळसा खाणी क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या- पालकमंत्री संजय राठोड

कोळसा खाणी क्षेत्रात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या- पालकमंत्री संजय राठोड
- Advertisement -

यवतमाळ, दि १८ (जिमाका):- वणी, माजरी क्षेत्रांतर्गत एकोणा, माजरी, निलजाई पैनगंगा, मुंगोली या कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकची कामे स्थानिकांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी वेस्टर्न कोल फिल्डच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कोळसा खाणीमध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात व तेथील स्थानिक वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, वणीचे उपविभागीय अधिकारी, वेकोलिचे महव्यवस्थापक संजयकुमार, आभाश चंद्रासिंग, आलोक ललितकुमार, ए. के. सिंग, ओ. पी. दुबे, अनिल हेपट, बिनेज कुमार, रोहित रमेश तसेच कामगार अधिकारी प्र. रा. महाले, राहुल बालमवार, रविश सिंह आणि वेस्टर्न कोल फिल्डचे अधिकारी उपस्थित होते.

वणी व माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या कोळसा खाणींमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक विकत घेतले आहेत. परंतु कोळसा वाहतुकीचे काम मोठ्या कंत्राटदारांना दिल्यामुळे स्थानिक गाडी मालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा तक्रारी  प्राप्त झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिकांना अडचणीत आणून जिल्ह्याबाहेरील लोकांना रोजगार देऊ नये. तसेच स्थानिकांना काम न देता इतर लोकांना रोजगार दिल्यास कंपन्यांच्या विरोधात स्थानिक रस्त्यावर उतरतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कंपन्यांना काम करणे कठीण होईल. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाचेही  मोठे नुकसान होईल याची जाणीव ठेऊन कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना श्री. राठोड यांनी केल्यात.

तसेच कोळसा खाणीमध्ये किती कामगार आहेत त्यांची आधार कार्डसह यादी सादर करावी. कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. कामगारांची वैद्यकीय तपासणी केली असल्यास त्याचा पुरावा, कामगारांची पोलीस पडताळणी तसेच पगार पत्रकाची माहिती सादर करण्याच्या तसेच यासाठी एक चमू नेमून या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोल वॉशरीजमध्ये कोळसा स्वच्छ करण्याची व्यवस्था असते तथापि, अनेक कोल वॉशरीजमध्ये  कोळशाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोल वॉशरिज मध्ये कोणत्या नियमानुसार कोळशाचा साठा ठेवता येतो याची तपासणी महसूल, खनिज आणि कामगार विभागाचे अधिकाऱ्यांनी करावी. त्याचा अहवाल सादर करावा. अनधिकृत साठा केला असल्यास  त्याला सील करावे, असे आदेश पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिले.

कोळशाच्या वाहतूकी दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील धूळ उडाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने कोळसा वाहतुकीच्या मार्गावर नियमित पाणी शिंपडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यासोबतच जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र उभारणीसाठी सीएसआर निधीतुन प्रस्ताव सादर करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

 

- Advertisement -