सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – कोविड काळामध्ये सर्वंच यंत्रणांनी केलेले काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्वांनी कोविडमध्ये आधार गमवावा लागलेल्या एकल महिला आणि बालके यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष द्यावे लागेल, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपजिल्हाधिकारी रोहयो अविशकुमार सोनोने, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी यशंवत बुधावले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. विनायक ठाकूर, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता हर्षद यादव, उप विभागीय अभियंता, महेश हिरेगौडर, प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत. कृषि अधिकारी पी.बी. ओळ, मोटार निरीक्षक व्ही.जी. आलमवार आदि सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यांनी कोविड मधील निधी वाटप, सानुग्रह अनुदान वाटप, एकल महिला व निराधार बालके यांच्या समस्या तसेच मनरेगा महिला सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात कोविडमध्ये १५३३ जणांचा मृत्यू झाला. शासनातर्फे त्यांच्या वारसांना देण्यात यायच्या प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानासाठी २०५७ अर्ज प्राप्त झाले. त्यात 1505 मंजूर करुन वारसांच्या खात्यात निधी वर्ग करण्यात आला. त्यापैकी 409 अर्ज नामंजूर करण्यात आले तर 143 प्रकरणी पडताळणी सुरु आहे. कोविड कालावधीत विविध उपाय योजनांवर 3 कोटी 30 लाख 63 हजार रुपये खर्च झालेला आहे.
विधीसेवा प्राधिकरणामार्फत अनाथ झालेल्या 18 पैकी 2 वारसांना प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले आहे. उर्वरित जणांना लवकरच वारस प्रमाणपत्र व मालमत्ता पत्रावर नोंद करुन देण्यात येणार आहे.
एकल महिला
ज्यांना पती गमवावा लागला अशा एकल महिलांना त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करा असे निर्देश डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिले. अशा महिलांच्या पतीच्या नावे शेती किंवा व्यवसाय असेल तर पतीच्या जागी त्यांचे नाव नोंदविण्यात यावे असे सांगून त्या म्हणाल्या की, या महिलांना कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे. बचत गट तसेच मनरेगामधून फळबाग लागवडीस अनुदान देणे शक्य आहे का याचीही माहिती घ्या असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. उच्चशिक्षित असणाऱ्या काही महिलाही यात एकल महिला झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न प्रशासनाने करावे असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
सुरक्षित पर्यटन
महिला सुरक्षेवर भर देताना सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने तो महिलांनाही पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित वाटेल यासाठी प्रयत्न करा. असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. कोविड कालावधीत पोक्सो सारख्या गुन्हाचे प्रमाण वाढलेले होते. त्या भूमिकेतूनही महिला सुरक्षा यंत्रणा मजबूत करा, असे सांगून त्या म्हणाल्या की, एकल महिलांची सुरक्षा व त्यांच्या लहान मुलींचे संरक्षण याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
याच बैठकीत आपत्ती व्यवस्थापन बाबतचा आढावा घेण्यात आला. आपत्ती येण्यापूर्वी सर्वच यंत्रणांनी योग्य ती तयारी करावी म्हणजे आपत्तीचा मुकाबला करणे शक्य होईल. यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आरंभी रत्नागिरी जिल्ह्यात आगमनाबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. निलम गोऱ्हे यांचे स्वागत केले.
00000