Home ताज्या बातम्या कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

0
कोश्यारी यांनी राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून केलेल्या कामाचा सन्मान – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मुंबई, दि. 21 : साधेपणा, विनयशीलता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा सन्मान म्हणजे त्यांच्यावरील ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक होय, असे गौरवोद्गार भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे काढले.

राजभवन, दरबार हॉल येथे डॉ. तुषार कांती बॅनर्जी लिखीत ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, रामनाथ कोविंद यांच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुस्तकाचे लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री.कोविंद म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संविधानिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे श्री.कोश्यारी यांची सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल ही वाटचाल प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरणारी आहे. संसद भवनाच्या दोन्ही सभागृहाचा कामाचा अनुभव असलेले श्री. कोश्यारी यांनी उत्तराखंडच्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. देशातील सैनिकासाठी ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यामध्ये श्री. कोश्यारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अध्यात्मिक अधिष्ठान असलेले श्री. कोश्यारी यांच्या कामाचा आवाका, अहोरात्र काम करण्याची वृत्ती आणि निस्वार्थी भावना ही प्रत्येक व्यक्तीसाठी अनुकरणीय आहे.

राजभवन लोकाभिमुख करण्याच्या वृत्तीतून कार्यरत असलेले श्री. कोश्यारी यांनी कोरोना संकटाच्या काळात देखील अहोरात्र काम करून संकट समयी एक आश्वासक नेतृत्व म्हणून दिलासा दिलेला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देत दुर्गम भाग, सीमा क्षेत्र, आदिवासी भाग या ठिकाणी भेटी देऊन जनसामान्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमात उपस्थितांमध्ये विविध क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब असल्याचे श्री. कोविंद म्हणाले. बहुआयामी जीवन जगत असलेले श्री. कोश्यारी यांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच भारताच्या सुरक्षेसाठी कायमच आवाज उठवला आहे अशा व्यक्तित्वाची ओळख करून देणारे हे पुस्तक निश्चितच वाचकांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षाही श्री. कोविंद यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या अष्टपैलू व्यक्तित्व आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले पुस्तक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला आणि व्यापक कार्याला साजेसे शीर्षक असलेले ‘भगत सिंह कोश्यारी : ए सोल डेडीकेटेड टू द नेशन’ हे पुस्तक वाचकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारे आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार करणारे देशभक्तीच्या संस्कारात आपले संपूर्ण जीवन अर्पण केलेले श्री. कोश्यारी यांनी या प्रदीर्घ वाटचालीत सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे आणि निष्ठेने पार पाडली आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते राज्यपाल यामध्ये मुख्यमंत्री, संसद प्रतिनिधी चारी सदनांच्या कामांचा अनुभव या सर्व पदाची जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली आहे. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आपली तीन वर्ष यशस्वीपणे पूर्ण करत असताना कोविड काळातही श्री.कोश्यारी यांचे काम सुरू होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी कार्यक्रम केले असून एकूण 1077 कार्यक्रमांना तर कुलपती म्हणून 48 दीक्षांत समारंभाना उपस्थिती लावली आहे. निश्चितच ही त्यांच्या कार्यक्षमतेची एक छोटीशी झलक आहे. ही कार्यपद्धती असल्यामुळेच श्री. कोश्यारी यांनी राजभवनला लोकभवन मध्ये परावर्तित केले आहे. जनसामान्यांसाठी राजभवन खुले करून त्यांनी लोकाभिमुख पद्धतीने यंत्रणेला काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्यासोबत अनेक चांगले गुण वैशिष्ट्ये आहेत. त्या सर्वांचा आढावा या पुस्तकाचे लेखकाने घेतला आहे. देशातील सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्यपालांनी पंतप्रधानांना सादर केलेला प्रस्ताव महत्त्वाचा ठरला आहे. श्री. कोश्यारी यांच्या व्यक्तित्वाला विविध पैलू असून त्यांचे काम जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पुस्तकासारखे अनेक खंड काढावे लागतील. इतके व्यापक काम श्री. कोश्यारी यांनी आजपर्यंतच्या वाटचालीत केलेले आहे. देशासाठी, समाजासाठी निस्वार्थपणे काम करण्याची वृत्तीही श्री. कोश्यारी यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. कोविड काळातही नियमितपणे काम करून त्यांनी एक आश्वासक नेतृत्व राज्याला दिले. खूप कमी काळात मराठी भाषा देखील शिकून घेतली, त्यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांच्या नेतृत्वाचा लाभ आपल्याला व्हावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली.

राष्ट्राप्रतीचा समर्पित भाव वृद्धींगत करुन प्रत्येकाने आपले सक्रिय योगदान राष्ट्रबांधणीत द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, गेल्या तीन वर्षात श्री. कोविंद यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळाले. पदाच्या प्रलोभनाला बळी न पडता देशसेवेचा भाव आपल्या कर्तृत्वाला अधिक उंची देतो. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने राष्ट्रउभारणीत योगदान दिल्यास देश निश्चितच उज्ज्वल वाटचाल करेल. संत महात्म्यांचा वैभवशाली वारसा आपल्या राष्ट्राला लाभला आहे. त्यामुळे अनेक आक्रमणे, आव्हानानंतरही एक राष्ट्र म्हणून भारत सक्षमपणे उभा आहे. राष्ट्राप्रतीचा समर्पित भाव अधिक वृद्धिंगत करुन प्रत्येकाने आपले सक्रिय योगदान राष्ट्रबांधणीत दिले तर आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण राष्ट्राला अधिक बलशाली करु, अशी अपेक्षा श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली.

असनसोल येथे बंगाली भाषेचे प्राध्यापक असलेल्या डॉ. तुषार कांती बॅनर्जी यांनी लिहिलेल्या 270 पानांच्या इंग्रजी चरित्रात्मक पुस्तकामध्ये श्री. कोश्यारी यांचे बालपण, शिक्षण, राजकीय प्रवास, संसद सदस्य म्हणून केलेले वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच राज्यपाल म्हणून केलेले कार्य यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.

००००