कौशल्य, गुणवत्ता आणि गतिमानतेतून पाटणच्या विकासाला नवी दिशा – महासंवाद

    - Advertisement -

    सातारा दि १६ : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता आणि पारदर्शकता आणण्याबरोबरच विकासकामांना अधिक गती देण्यासाठी पाटण पंचायत समितीच्या वतीने कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दौलतनगर (मरळी) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या  उपस्थितीत पार पडला.

    पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करावे, असे सांगून  पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतिमान प्रशासन कसे असते हे आपण पाटण तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. सरकारी अधिकारी हे लोकप्रतिनिधींप्रमाणेच जनतेचे सेवक आहेत. आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान करायचे आहे.  केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे, कामांचा दर्जा सुधारणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे यावर भर द्यावा तसेच सर्व विभागणी सामन्याने काम करून पंचायत समिती लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

    या बैठकीस जिल्हा परिषद, सातारा येथील सर्व विभागांचे विभागप्रमुख,  पंचायत समिती, पाटणच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम यांसह अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    प्रशासकीय कामकाजात कौशल्यवृद्धी, सेवांचा दर्जा, योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि कामातील गतिमानता या बाबींवर बैठकीत विशेष चर्चा होणार आहे. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन अडचणी समजून घेणे, त्यावर उपाययोजना निश्चित करणे आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी समन्वित कार्यपद्धती विकसित करणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

    प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढवून विकासकामांना गती देणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे, या दृष्टीने पाटण तालुक्यातील हा कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

    ००००
    - Advertisement -