Home बातम्या ऐतिहासिक क्रीडा पार्क व ग्रंथालय प्रकल्पांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून आढावा – महासंवाद

क्रीडा पार्क व ग्रंथालय प्रकल्पांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून आढावा – महासंवाद

0
क्रीडा पार्क व ग्रंथालय प्रकल्पांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून आढावा – महासंवाद

नागपूर दि. 28 : इंदोरा भागातील आहुजानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा पार्क आणि अशोकनगर येथे राममनोहर लोहिया ग्रंथालय उभारण्याच्या कामाचा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज एका बैठकीत सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना या बांधकामाविषयी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. क्रीडा पार्कमधील जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या लोकांचा प्रवेश आणि सुरक्षेसंदर्भात काही बदल सुचवून दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही  त्यांनी दिले.

आहुजानगर येथील  11 हजार 620 चौरस मीटर आरक्षित जागेत क्रीडा पार्कचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात 5 कोटी रुपये खर्च करून तळमजला, संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, व्यायाम शाळा, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल कोर्ट, खो-खो, कबड्डी ग्राउंड, इनडोअर गेम हॉल, उपहारगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्याविषयी समाधान व्यक्त करून पालकमंत्र्यांनी दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अशोकनगर येथे 1458 चौरस मीटर जागेवर डॉ. राममनोहर लोहिया ग्रंथालय आणि अध्ययन कक्षाची निर्मिती केली जात आहे. या बांधकामांवर 14 कोटींचा खर्च केला जाणार आहे.

पालकमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पांच्या बांधकाम आराखड्याचे सादरीकरण बघून महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.

या बैठकीला जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000