Home ताज्या बातम्या क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक काम व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक काम व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या माध्यमातून दिशादर्शक काम व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. 9 : क्वालिटी सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक शहरातील स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत होणारे काम इतरांना दिशादर्शक ठरेल. या प्रकल्पासाठी आपण टीम म्हणून काम करताना यासाठी आवश्यक ते सहकार्य शासनाकडून करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल डॉ. रवी सिंग, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट (एनएसडीसी)कॉर्पोरेशनचे पश्चिम विभागाचे प्रमुख मोहम्मद कलाम,  एनएसडीसीचे संचालक जीतूभाई ठक्कर, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, नाशिक सिटीझन्स फोरमचे अध्यक्ष आशिष कटारीया, ‘नाईस’ चे विक्रम सारडा, फोरमचे माजी अध्यक्ष हेमंत राठी, रामकृष्ण आरोग्य संस्थानचे संदीप कुयटे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, क्वालिटी सिटी अभियानाचा प्रयोग पहिल्यांदाच नाशिक येथे होत आहे. या अभियानासाठी नाशिक शहरातील विविध संस्था एकत्र येत आहेत यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या शहरासाठी आपुलकी आणि जिव्हाळ्याच्या भावनेतून आपण सर्व एकत्र आला आहात, त्यामुळे हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल. या अभियानाच्या अंमलबजावणीनंतर नाशिक शहरात सकारात्मक बदल दिसतील. त्यानुसार भविष्यात इतरही शहरांमध्येही हे अभियान राबविण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

क्वालिटी सिटी नाशिक अभियानाविषयी…

दर्जाच्या गुणांकन आणि मानांकन क्षेत्रातील भारताची शिखर संस्था असलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या पुढाकाराने  क्वालिटी सिटी नाशिक अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानाच्या यशस्वितेसाठी नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद,  क्रेडाई नाशिक मेट्रो, नाशिक सिटीझन्स फोरम आणि रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्यासह नाशिकमधील सुमारे तीसहून अधिक संस्था संघटना या सामंजस्य करारात सहभागी झाल्या आहेत.

स्कील इंडीया अर्थात कौशल भारत कुशल भारत मोहिमेअंतर्गत क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली क्वालिटी सिटी नाशिक चळवळ सुरू करण्यात आली आहे.   ‘क्वालिटी सिटी नाशिक’ अभियानांतर्गत  कौशल्य  विकास, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांवर पहिल्या टप्प्यात भर देण्यात येणार आहे.  नाशिक शहरातील घरगुती कामगार, वाहन चालक, शिपाई आणि पर्यवेक्षक यांच्या कौशल्य विकासाचा कार्यक्रम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे.

देशातील शहरांच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी तेथील मनुष्यबळाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी ही चळवळ नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाईल. ही चळवळ पथदर्शी स्वरुपात राहणार असून पुढे देशभरातील अन्य शहरांमध्येही तिचे अनुकरण केले जाऊ शकेल.