Home शहरे अकोला क्षमा करता व मागता आली पाहिजे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

क्षमा करता व मागता आली पाहिजे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0
क्षमा करता व मागता आली पाहिजे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई दि. 18: प्रभू श्रीराम क्षमा गुणाचे मूर्तिमंत उदाहरण होते. जैन धर्मात क्षमा या गुणाला विशेष महत्त्व दिले आहे. मात्र क्षमा करण्यास त्याग व तपस्या हवी. गृहस्थाश्रमी लोकांनी अर्थार्जन करून समाजातील दीन, दुःखी व उपेक्षितांची मदत केली तरी देखील क्षमापर्व व विश्वमैत्री दिवस सफल होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केली.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे बिर्ला मातोश्री सभागृह येथे आयोजित ‘विश्वमैत्री दिवस व क्षमापना’ समारोहात भाग घेतला तसेच श्री मुंबई जैन संघटनेच्या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित जैन तपस्वी रथयात्रा व धर्मसभा समारोहात जैन समाज बांधवांशी संवाद साधला.

प्रभू श्रीराम हे पृथ्वीप्रमाणे क्षमाशील होते. क्षमा हे वीराचे भूषण आहे. क्षमा करण्यासाठी मन मोठे लागते, असे सांगून आपल्या देशातील संतांनी क्षमाशीलतेची परंपरा जिवंत ठेवली असे राज्यपालांनी सांगितले.

सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे जैन समाजाकडून शिकण्यासारखे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 जैन समाज उद्यमशील आहे. व्यापार उदीम करून नोकरी देणारा हा समाज आहे. मैत्री करताना प्रसंगी क्षमा मागण्याची जोड दिली तर समाजातील दंगे – धोपे संपतील हा विचार जैन समाज करतो. सृष्टीत प्रत्येक जीवाचे वेगळे महत्त्व आहे, हे जैन समाजाने जाणले आहे. त्यामुळे सृष्टीचे संवर्धन कसे करावे हे जैन समाजाकडून शिकण्यासारखे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. व्यापार उदिमाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या दृष्टीने शासन व्यावसायिकांना पूर्ण सहयोग करेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निती आयोगाच्या बैठकीच्या वेळी केंद्र शासन राज्याला विकास कार्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आपल्याला दिले, तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याच्या १२००० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते जैन समाज चातुर्मास पुस्तिका व शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. विश्वमैत्री दिवस कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश मेहता, जैन आचार्य कीर्तीप्रभ सुरीश्वरजी महाराज, साध्वी सोमलता तसेच रमेश जैन, बाबुलाल भन्साळी, अतुल शहा, राजपुरोहित व चारही जैन पंथांचे साधू – साध्वी उपस्थित होते. तर श्री मुंबई जैन संघटनेच्या रथयात्रा व धर्मसभा कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, जैन संत गच्छाधिपती, नयपद्मसागर महाराज व इतर जैन तपस्वी उपस्थित होते.

 

00000