Home शहरे कोल्हापूर खंडोबा मंदिरात आजपासून चंपाषष्टी उत्सव

खंडोबा मंदिरात आजपासून चंपाषष्टी उत्सव

0

 कोल्हापूर: जमिनीखाली २५ फूट खोल आणि मंदिरावर मुस्लिम स्थापत्य शैलीतील डेरेदार घुमट अशी रचना असलेल्या प्राचीन खोलखंडोबा मंदिरात बुधवारी (ता.२७) चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ होत आहे. रविवारी (ता.१) खंडोबाचा जागर तर सोमवारी (ता.२) उत्सवाचा मुख्य दिवस असून रात्री पालखी सोहळा होणार आहे.

ब्रह्मपुरीनंतर उत्तरेश्वर आणि खोल खंडोबा ही शहरातील प्राचीन वस्ती समजली जाते. शहरात अनेक मंदिरे असले तरी जमिनीखाली २५ फूट जमिनीखाली खोल मंदिर असल्याने खोल खंडोबा नावाने मंदिर ओळखले जाते. भल्यामोठ्या शिळांनी मूळ मंदिर बांधले असून मंदिरात चौथरा आहे. मंदिरात दगडी शिवलिंग असून हे खंडोबाचे मूळ स्थान समजले जाते. गाभाऱ्यात खंडोबाच्या पत्नी बाणाईची छोटी मूर्ती आहे.

मंदिरात जाण्यासाठी १७ पायऱ्या आहेत. तसेच जमिनीपासून सात फूट उंचीच्या दगडी भिंती आहेत. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे.

बुधवारी (ता.२७) सकाळी मार्गशीर्ष प्रतिपदेच्या महुर्तावर चंपाषष्ठी उत्सवास सुरूवात होणार आहे. मंदिराचे प्रमुख विश्वस्त खंडेराव जगताप, घनश्याम जगताप यांच्या उपस्थितीत अभिषेक होणार आहे. उत्सवकाळात वाघ्या मुरळीचे कार्यक्रम होणार असून रविवारी (ता.१) जागरानिमित्त भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता.२) चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी रात्री साडेसात वाजता पालखी सोहळा होणार आहे.