हायलाइट्स:
- केकेआर ११ च्या सेटवर अभिनेता वरुण सूदला अपघात
- कार्यक्रमासाठी एक साहसी दृश्य चित्रीत करताना झाला अपघात
- हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर मिळाला डिस्चार्ज
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खतरों के खिलाडीच्या ११ व्या पर्वामध्ये अभिनेता वरुण एक धोकादायक असे साहस दृश्य चित्रीत करत होता. त्यावेळी वरुण जखमी झाला. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली आहे. या अपघातानंतर वरुणला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर आवश्यक ते उपचार केले आहेत. अपघातामध्ये वरुणच्या हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळाने वरुणची तब्येतीत सुधारणा झाली. हाताला झालेली दुखापत बरी होण्यासाठी दोन-तीन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी वरुणला दिला होता. परंतु हा सल्ला न ऐकता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर वरुण पुन्हा सेटवर हजर झाला. वरुणच्या अपघातानंतर कार्यक्रमाचे होस्ट रोहित शेट्टी यांनी अशी घटना पुन्हा घडू नये याची सर्वोतपरी काळजी घेतली जात असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
याआधी ही अभिनेता वरुण सूदने रोडिज आणि स्प्लिट्सविला यांसारख्या रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘खतरों के खिलाडी ११’ च्या सेटवरचे, अन्य स्पर्धकांसोबतचे फोटो, व्हिडीओ वरुण त्याच्या सोशल मीडियावर शेअर करतो. अलिकडेच वरुणने इंस्टाग्राम स्टोरीवर काही पोस्ट्स शेअर केल्या आहेत. त्यात तो त्याच्या स्टंटची तयारी करताना दिसला होता. यातील एका पोस्टमध्ये तो दोरीने उडी मारताना दिसला होता. त्याबद्दल त्याने लिहिले होते की, खतरों के खिलाडी ११ मध्ये येण्यापूर्वी रणविजय सिंघाने हा व्यायाम शिकवला होता.
दरम्यान, कार्यक्रमातील स्पर्धक आणि अभिनेत्री अनुष्का सेनला करोना झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर अनुष्काला सर्वांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. सेटवरील सर्वांची करोना टेस्ट झाली असून बहुतांशजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.