सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपाची 633 व रब्बीची 103 गावे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून निव्वळ लागवडीखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. यामध्ये सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 हेक्टर असून भूपृष्ठावरील सिंचीत क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 हेक्टर आहे. ठिबक सिंचनाचे क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर तर 83 हजार 219 विहीरी जिल्ह्यात आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन, ऊस, गहू, हरभरा यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 977 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची त्याखालोखाल 56 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची, 51 हजार 755 हेक्टरवर सोयाबीन, 44 हजार 651 हेक्टरवर मका, 38 हजार 791 हेक्टरवर खरीप ज्वारी यांची पेरणी झाली. तर खरीप हंगाम सन 2022-23 साठी 1 लाख 22 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर ऊस, 60 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, 38 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी, 44 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर मका, 38 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भुईमुग, 51 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 18 हजार 200 हेक्टरवर उडीद, 15 हजार 700 हेक्टरवर भात, 11 हजार 800 हेक्टरवर तूर, 9 हजार 500 हेक्टरवर मूग, 8 हजार 300 हेक्टरवर इतर कडधान्य पेरणीचे उद्दिष्ट असून उत्पादन व उत्पादकता या दोहांमध्ये वाढ करण्यासाठीही जिल्ह्यातील शेतकरी आणि विभाग प्रयत्नशील आहेत.
सांगली जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये पर्जन्यमान चांगले राहिले आहे. गतवर्षी 770 मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. खरीप हंगाम सन 2022 साठी 64 हजार 24 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून महाबीजकडून या हंगामासाठी 15 हजार 175 क्विंटल तर खाजगीरित्या 22 हजार 815 क्विंटल बियाणांची उपलब्धता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडे 63 हजार 336 क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके अशा विविध प्रकारची 1 लाख 51 हजार 530 मेट्रीक टन खतांची उपलब्धता आहे. तर सध्याचा शिल्लक साठा 43 हजार 111 मेट्रीक टनाचा आहे.
रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा वापर वाढविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून सध्या सांगली जिल्हा नॅनो युरिया वापरामध्ये राज्यात अग्रेसर आहे. जीवाणू खत वापरासाठी बीज प्रक्रिया मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोटॅशला पर्यायी खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऊस पिकासाठी बेसल व भरणी डोसेसमध्ये BIO-Enriched Organic Mannure चा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये 30 ते 40 टक्के बचत व खर्चात 50 टक्केपर्यंत बचत होणार आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2 हजार 249 बियाणे, 2 हजार 947 खते व 2 हजार 450 कीटकनाशके परवानाधारकांच्या माध्यमातून कृषि निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण निविष्ठा वितरीत व्हाव्या यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी मिळून 32 गुणनियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सन 2021-22 मध्ये 30 बियाणे व 11 रासायनिक खते अप्रमाणित नमुन्यांवर केसेस दाखल केल्या आहेत. 104 बियाणे, 140 रासायनिक खते व 14 कीटकनाशके परवानाधारकांवर निलंबनांची कारवाई कृषी विभागाने केली आहे. तर 11 बियाणे, 39 रासायनिक खते व 44 कीटकनाशके परवानाधारकांना विक्री बंदी करण्यात आली आहे.
खरीप हंगाम सन 2022-23 साठी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून 11 भरारी पथके जिल्ह्यात स्थापन केली आहेत. जिल्हास्तरावर 30 मार्च पासून सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून 15 हजार 880 शेतकऱ्यांना 7 हजार 940 हेक्टर क्षेत्रासाठी ठिबकचा तर 140 शेतकऱ्यांना 115 हेक्टरसाठी तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 223 शेतकऱ्यांना तर रब्बी हंगामासाठी 79 हजार 430 शेतकऱ्यांना सन 2021-22 मध्ये 2 हजार 188 कोटी 11 लाख रूपये कर्ज विविध बँकाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्येही बँकनिहाय पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून खरीपसाठी 1 हजार 994 कोटी 64 लाख तर रब्बीसाठी 855 कोटी 37 लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासहायास, विनाविलंब पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत.
शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय व जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 0233-2601412, 0233-2601413, 0233-2372718 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
श्रीमती वर्षा पाटोळे,
जिल्हा माहिती अधिकारी,
सांगली