अहमदाबाद : भुजमधील श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये (एसएसजीआय) खळबळजनक घटना घडली आहे. विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे का हे पाहण्यासाठी एसएसजीआय हॉस्टेल प्रशासनाने त्यांचे कपडे काढायला सांगितले. ६८ विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार भूजमध्ये घडला आहे.
भुजमधील एसएसजीआय या हॉस्टेलमध्ये ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळीत कोण आहे याची तपासणी करण्यासाठी चक्क त्यांना कपडे काढायला बळजबरी केली. हॉस्टेलच्या वॉर्डनने काही मुली मासिक पाळीत असताना हॉस्टेलच्या स्वयंपाकघरात जातात, मंदिराच्या आसपास फिरतात तसेच इतरांना स्पर्श करतात अशी तक्रार केली. नंतर काही मुलींना वॉशरूममध्ये त्वरित नेण्यात आले आणि त्या मासिक पाळीत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांचे अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यात आली.
भुजमधील स्वामीनारायण मंदिराच्या अनुयायी हे महाविद्यालय आणि हॉस्टेल चालवितात. श्री स्वामीनारायण कन्या मंदिराच्या आवारात हे हॉस्टेल उभे आहे. संस्थेच्या निकषानुसार, मासिक पाळीत स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापासून किंवा मंदिराजवळ जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्श करण्याची परवानगी नाही. महाविद्यालयात १५०० हून अधिक विद्यार्थी ६८ दुर्गम खेडेगावातून आले आहेत. हॉस्टेलच्या प्राध्यापिका रीटा रनिंगा यांच्याकडे काही अधिकाऱ्यांनी तक्रार केली की, मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनी स्वयंपाक घरात गेले असून मंदिराजवळ फिरले. त्यानंतर हॉस्टेल प्रशासनाने या विद्यार्थिनींना वर्गातून बाहेर पडण्यास जबरदस्ती केली आणि पॅसेजमध्ये रांगेत उभे केले.
नंतर विद्यार्थिनींना रेस्टरूममध्ये नेवून त्यांना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले. जेणेकरुन त्या मासिक पाळीत आहेत की नाही हे तपासू शकतील. या प्रकरणाची दखल घेत क्रांतिगुरू श्यामजी कृष्णा वर्मा कच्छ विद्यापीठाच्या कुलगुरू दर्शना ढोलकिया यांनी सांगितले की, या प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. या घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.