Home शहरे उस्मानाबाद खाजगी सावकार अन बँकेच्या वसुलीच्या धास्तीने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

खाजगी सावकार अन बँकेच्या वसुलीच्या धास्तीने कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

0

उस्मानाबाद । प्रतिनिधी । १२ एप्रिल : शेतात ठिबक सिंचन करण्यासाठी एका बँकेकडून, ट्रॅक्टरसाठी अन्य एका बँकेकडून आणि शेतीचा रोजचा खर्च भागविण्यासाठी खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन मेटाकुटीला आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील अनसुरडा येथील अवघ्या पस्तिशीतील सूर्यभान दत्तू दराडे या शेतकऱ्याने आपल्या पत्नीसह दोन लहान मुली आणि एका लहान मुलग्यास पोरके करून गळफास लावून आत्महत्या केली आहे. शेताशेजारी नदी कडेला असलेल्या उंबराच्या झाडाला त्यांनी शनिवारी (ता. ११) गळफास लावून घेतला. शेजाऱ्याच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी लगेच बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी सकाळी मयताच्या पार्थिवावर अनसुरडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले.

शेतात ठिबक सिंचन करण्यासाठी एका बँकेकडून चार वर्षांपूर्वी दहा लाख रुपये आणि ट्रॅक्टरसाठी अन्य एका बँकेकडून जवळपास एवढेच कर्ज त्यांनी घेतले होते. मात्र मागील चार पाच वर्षात कायम अवर्षण असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्याच दरम्यान शेतातील मजुरी आणि अन्य खर्च भागविण्यासाठी शेजारील गावाच्या खाजगी सावकारांकडून त्यांनी दोन चार लाख रुपयांचे कर्ज काढले होते. शेतातून निघणारे उत्पन्नही या साऱ्यांचे देने देण्यासाठी पुरत नव्हते. त्यामुळे खाजगी सावकार आणि बँकांच्या परतफेडीचा तगादा असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या धास्तीने शेवटी सूर्यभान या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.