Home बातम्या खामगावच्या तीन नगरसेवकांचे पद कायम!

खामगावच्या तीन नगरसेवकांचे पद कायम!

खामगाव : स्थानिक नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांच्यासह दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खारिज करण्यात आली. काँग्रेसपक्षनेत्या अर्चना टाले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंद व्यक्त होत असतानाच, विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खामगाव नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या संजय मुन्ना पुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पालिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या शहेरबानो जहीरशहा आणि जकीयाबानो मो. अनिस जमादार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणाºया पुरवार आणि दोन अपक्ष नगरसेविकांवर पक्षातंर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यासाठी काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले आणि नगरसेवक इब्राहिम खा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली.
यामध्ये जिल्हाधिकाºयांनी संजय पुरवार यांना पात्र तर नगरसेविका शहेरबानो जहीरशहा आणि जकीयाबानो मो. अनिस जमादार यांना अपात्र ठरविले. त्यानंतर दोन नगरसेविकांनी राजमंत्री नगरविकास यांच्याकडे पात्र ठरविण्यासाठी अपिल दाखल केले. त्याचवेळी मुन्ना पुरवार यांना अपात्र ठरविण्यासाठी नगरसेविका टाले आणि इब्राहीम खान यांनीही राज्यमंत्र्यांकडे याचिका दाखल केली.
राज्यमंत्र्यांनी पुन्हा मुन्ना पुरवार यांचे पद कायम ठेवत, दोन्ही नगरसेविकांना पात्र ठरविले. याप्रकरणी आक्षेप नोंदवित काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले आणि नगरसेवक इब्राहिम खान यांनी तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवार २२ जुलै रोजी न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावली झाली. २२ जुलै राखून ठेवण्यात आलेला निकाल २९ जुलै रोजी देण्यात आला. यामध्ये काँग्रेस नगरसेविका अर्चना टाले, इब्राहिम खान खांची याचिका फेटाळून लावत, तिन्ही नगरसेवकांना पात्र ठरविले. याप्रकरणी भाजप नगरसेवकांच्यावतीने अ‍ॅड. सुरेश मेहाडिया यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. रमेश भट्टड यांनी सहकार्य केले. याप्रकरणी काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होवू शकल्या नाहीत.