या कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार सर्व सामर्थ्यानिशी काम करत आहे. सरकार सत्तेत आल्यावर सुरुवात चांगली झाली. आपण खूप चांगल्या योजना, संकल्पना राबविण्याचे निश्चित केले होते. पण करोनामुळे याला मर्यादा आल्या. करोनासंकट वाढले आहे. यामुळे जगण्यावर निर्बंध आले, परिणामी, अर्थचक्र मंदावले. याचे दुष्परिणाम शहरांबरोबरच ग्रामीण आणि आदिवासी भागावरही होत आहेत. आदिवासी कुटुंबाना दिलासा देण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. ऑनलाइन पद्धतीने शनिवारी, एकाच वेळी १२ लाख कुटुंबाच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
आदिवासींना स्वावलंबी बनवण्यास कटिबद्ध
पालघर, चंद्रपूर, नंदूरबार हा सगळा भाग जंगलात वसला आहे. येथे निसर्गसौंदर्य आहे, आदिवासींजवळ जगाला भुरळ पाडणारी कला, संस्कृती आहे. याचा उपयोग करून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी इथल्या पर्यटनाला चालना देत आहोत. आदिवासी विकासासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून आदिवासींना स्वावलंबी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आदिवासी विकास मंत्री नेटाने काम करत आहेत, विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांचेही मोठे योगदान आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.