‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त ५८ सुवर्णपदकांसह १५८ पदकं जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन – महासंवाद

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त ५८ सुवर्णपदकांसह १५८ पदकं जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन – महासंवाद
- Advertisement -




उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन

मुंबई दि. १६ :- महाराष्ट्रानं ५८ सुवर्ण ४७ रौप्य ५३ कांस्य असं एकूण १५८ पदकांची लयलूट करत ‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविलं. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू व सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहील असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’तील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की बिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रानं केलेली नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद कौतुकास्पद आहे. स्पर्धेतल्या २७ पैकी २२ खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकं जिंकली. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदकं मिळाली. जलतरण स्पर्धेत सात सुवर्ण पदकांसह महाराष्ट्रानं २९ पदकं जिंकली. राज्याला जिम्नॅस्टिक्स आणि नेमबाजीत प्रत्येकी सहा वेटलिफ्टिंगमध्ये पाच तसंच कुस्ती सायकलिंग नेमबाजीचीही सुवर्णपदकं मिळाली. या युवा खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक खेळांकडे वळतील. परिश्रमानं उत्तम खेळाडू बनतील. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला समृद्ध आणि राज्याला निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी ही कामगिरी मदत करेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

—–०००००००—–







- Advertisement -