Home गुन्हा गंमत म्हणून मुख्याध्यापक, शिक्षिका, मुलींना पॉर्न क्लिप पाठवत होता; पुण्यातील प्रकार

गंमत म्हणून मुख्याध्यापक, शिक्षिका, मुलींना पॉर्न क्लिप पाठवत होता; पुण्यातील प्रकार

0

मुंबई : स्मार्टफोन आणि गॅजेट्समुळे शाळेतील विद्यार्थी बिघडू लागल्याची ओरड सर्वत्र होत आहे. पुण्यातील एका नामवंत शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पाल्यांना मोबाईल देताना पालकांवर विचार करण्याची वेळ आली आहे. एका विद्यार्थ्याने शाळेच्या मुख्याध्यापकांपासून वर्ग मैत्रिणींपर्यंत फेक मेल आयडीद्वारे पॉर्न क्लिप पाठविल्याचा प्रकार उघड झाला आहे. 


लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑगस्ट ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान घडलेली आहे. याकाळात मुख्याध्यापकांपासून शिक्षिका आणि 65 विद्यार्थीनींना सतत पॉर्न व्हिडीओ पाठविण्यात आले. हळू हळू सर्वांनाच याची कुणकुण लागली, की हे अनेकांसोबत होत आहे. जेव्हा हे प्रकरण शाळा प्रशासनाकडे गेले तेव्हा चौकशी सुरू झाली. यानंतर तपासात ज्या मेल आयडीवरून या क्लिप पाठविल्या जात होत्या त्याचा आयपी अॅड्रेस शोधण्यात आला. तेव्हा एका परदेशातून पुण्यात आलेल्या एका विद्यार्थ्याचा शोध लागला.

हा विद्यार्थी अभ्यासात हुशार आणि टेक्नोसेव्ही आहे. त्यांने गुन्हा कबूल करत हे सर्व गंमत म्हमून केल्याचे सांगितले. त्याला हे करणे गुन्हा असल्याचे माहिती नव्हते. तो त्याच्या वर्गमित्र आणि शिक्षकांना त्रास देणार होता. या कबुलीनंतर शाळेने त्याला काढून टाकले होते. नंतर तो त्याच्या देशात निघून गेला होता. 


मात्र, शाळेने काही महिन्यांनंतर आता पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. यानंतर हे प्रकरण सायबर क्राईमला वर्ग झाले. पुणे ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी सांगितले की, शाळेने कारवाई करण्यापूर्वीच तपास केला होता. त्यानंतर आमच्याकडे खूप उशिराने संपर्क साधला. एका शिक्षिकेने तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांनाही हे मेल केले होते. यामुळे आरोपी विद्यार्थ्याविरोधात पॉक्सो कायद्यासह आयटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला बाल कल्याण समितीसमोर आणले जाणार आहे.