गडचिरोली: नक्षलवादी चकमकीतील शहिदांना पोलीस प्रशासनाकडून मानवंदना

- Advertisement -

दु:खात सहभागी : पालकमंत्री विजय वडेट्टीवार

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत शहीद झालेल्या पोलिसांना राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसवाल यांनी श्रद्धांजली वाहिली. शहीद झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (वय 29) व पोलीस शिपाई किशोर आत्राम (वय 30) यांचा समावेश आहे. धनाजी होनमाने यांना नुकतेच नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेत एक जवानही जखमी झाला आहे. जखमी पोलीस जवानावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

पोलीस दलातर्फे शहीद पोलीस जवानांना येथील पोलीस कवायत मैदानावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सशस्त्र पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी  हवेत झाडून सलामी देण्यात आली. पोलीस दलातर्फे संपूर्ण शासकीय प्रथेनुसार शहीद पोलीस जवानांना भावपूर्ण मानवंदना दिली. यावेळी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैसस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक विशेष अभियान राजेंदर सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या घटनेत शहीद झालेल्या पोलिसांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहिद जवान आत्राम यांचे परिवार उपस्थित होते. पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक यांनी यावेळी शहीद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व त्यांचे सांत्वन केले.

शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी : विजय वडेट्टीवार

पालकमंत्र्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे ते म्हणाले. शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी घटना असून शहिदांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतून दुरध्वनीद्वारे या घटनेबाबत शोकसंदेश प्रशासनाला दिला. ते बैठकीसाठी मुंबई येथे पोहोचले असताना त्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेऊन तातडीने पोलीस प्रशासनाला संबंधित जवानांच्या कुटुंबियांना धीर देण्याबाबत विनंती केली. या घटनेची चौकशी करण्याबाबतही वरिष्ठ पोलीस यंत्रणेशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -