Home शहरे पुणे गणपती पाहायला पुण्यात येताय ? मग या मानाच्या ५ गणपतींना नक्की भेट द्या

गणपती पाहायला पुण्यात येताय ? मग या मानाच्या ५ गणपतींना नक्की भेट द्या

0

पुणे प्रतिनिधी : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केल्यानंतर पहिला मानाचा गणपती हा पुण्यातील टिळक वाड्यात बसलवा. त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवाला अधिक महत्व आहे. पण खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्याच्या आधी पासून पुण्यात काही ठिकाणी गणपती बसवले जात होते. त्यामुळे गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर हे गणपती पुण्यातील मानाचे गणपती ठरले आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवात जर तुम्ही गणपती पाहण्यासाठी पुण्यात येणार असाल तर या मानाच्या ५ गणपतींना नक्की भेट द्या.

१) कसबा गणपती :

कसबा गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत आहे. या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. त्यामुळे पुण्यात हा गणपतीला मानाचा पहिला गणपती मानला जातो.

२) श्री तांबडी जागेश्वरी गणपती :

श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचे दुसरे स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणे या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथेच ४ युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते.

३) श्री गुरुजी तालीम गणपती :

पूर्वी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. सार्वजनिक गणेशउत्सव सुरू होण्याआधी ५ वर्ष या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

४) श्री तुळशीबाग गणपती :

तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात.

५) श्री केसरी गणपती :

पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने येथे होत असत. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे.