गणरायाच्या स्वागताच्या सज्जतेचे बिगुल

गणरायाच्या स्वागताच्या सज्जतेचे बिगुल
- Advertisement -

म. टा. विशेष प्रतिनिधी
मुंबई : वर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर करोना नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने उत्सवाची तयारी सुरू केली आहे. मंडपांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असताना दादर, गिरगाव, जुहू यासह सर्व विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. निर्माल्य कलशांची डागडुजी, निर्माल्य व बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी डम्पर भाड्याने घेण्यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या.

करोनाच्या संकटामुळे यंदाही सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींची उंचीची मर्यादा चार फुटांची ठेवण्यात आली असून, घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटांची ठेवण्यात आली आहे. यासोबत नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून गणपतीचे दर्शन ऑनलाइन पद्धतीने ठेवावे, यासह विविध प्रकारच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. सरकारी नियमावलीनंतर पालिकेने आपले नियोजन सुरू केले असून, विभाग कार्यालयांना आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. तर मुंबई सार्वजनिक समन्वय समितीने पालिका आणि राज्य सरकारकडे उत्सव नियोजनाची बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे, असे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाऊस नसेल त्या दिवशी दिवसरात्र खड्डे बुजवण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश रस्ते विभागाला देण्यात आले आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वी रस्त्याच्या कडेला सर्व्हिस रोड व फूटपाथच्या बाजूच्या पट्ट्या काळ्या, पिवळ्या रंगाने रंगवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुंबईत गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, मालाड मार्वे या सहा प्रमुख ठिकाणांसह ८४ मोठी विसर्जन स्थळे आहेत. तसेच विभागनिहाय तलावांमध्येही विसर्जन सोहळा आयोजित केला जातो. या सर्व ठिकाणी निर्माल्य कलश उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. तुटलेल्या फुटलेल्या कलशांची दुरुस्ती तसेच आवश्यक असेल तिथे नवीन कलश घेतले जाणार आहेत. विसर्जनासाठी यंदाही कृत्रिम तलावांवर भर दिला जाणार असून कोणत्या विभागात किती तलाव उभारायचे याचे नियोजन केले जात असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. गिरगावातही तयारी झाल्याची माहिती गिरगाव डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. दादर चौपाटीवर देखील आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

केंद्र सरकारचे राज्याला पत्र
दरम्यान, गणेशोत्सव आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात येत्या काळात सणासुदीचे दिवस असून करोना नियमांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, ३१ ऑगस्टपर्यंत करोना पूर्ण नियंत्रणात येईल, यासाठी पावले उचलावीत, अशा सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना २८ जुलै रोजी पाठवलेल्या पत्रात केल्या आहेत.

अशी आहे तयारी
– मंडपांसाठी ऑनलाइन, ऑफलाइन परवानगी

– पाऊस नसताना दिवसरात्र खड्डे बुजवण्याचे काम

– सर्व्हिस रोड, फूटपाथच्या बाजूच्या पट्ट्या रंगवणार

– गिरगाव चौपाटीवर पाच कृत्रिम तलाव, दोन फिरते तलाव

– चौपाटीवर तीन मूर्ती संकलन केंद्रे

– भाविकांकडून मूर्ती घेऊन कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

– लाइफगार्ड, स्टील प्लेट्स, विद्युत यंत्रणा यांची तयारी लवकरच

Source link

- Advertisement -