हायलाइट्स:
- अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांसाठी खूशखबर
- श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन दर्शनाची सोय
- मंदिर समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली माहिती
‘अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्त श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड १९ संसर्ग निर्बंध नियमावली नुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं,’ अशी विनंती श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आदेश बांदेकर यांनी केली आहे.
‘२७ जुलै रोजी मध्यरात्री साडेबार वाजल्यापासून गणेशभक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येईल. यासाठी श्रीसिद्धिविनायक टेम्पल अॅप डाऊनलोड करावे आणि घरी राहून सुरक्षित दर्शन घ्यावे, मंदिर बंद असल्याने कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये,’ असं आवाहनही आदेश बांदेकर यांनी केलं आहे.
दरम्यान, अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक गोष्टींना मुभा दिल्यानंतरही मंदिर दर्शनाबाबत निर्बंध ठेवण्यात आल्याने भाजपकडून वारंवार राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण यापूर्वीच सरकारकडून देण्यात आलं आहे.