Home ताज्या बातम्या गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिस खडा पहारा देणार आहे

गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिस खडा पहारा देणार आहे

0

पुणे – गणेशोत्सवात अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिस खडा पहारा देणार आहेत. त्यासाठी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरामध्ये तब्बल सात हजार पोलिस बंदोबस्तासाठी असतील. या शिवाय बाहेरील शहरांमधूनही अतिरिक्त कुमक मागविली जाणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम व सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांच्याकडून बंदोबस्ताची आखणी केली जात आहे. संवेदनशील व महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. गृहरक्षक दलाचे जवान मध्यभागात बंदोबस्तासाठी असतील. तसेच बेलबाग चौक, मंडई परिसरात चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालणार आहेत. 

तरुणी, महिलांच्या छेडछाड रोखण्यासाठी स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेचे पथके कार्यरत राहणार आहेत.

उत्सवामध्ये मध्य भागातील मानाची मंडळे, प्रमुख मंडळांच्या परिसरामध्ये बाँबशोधक व नाशक पथकाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रमुख मंडळांच्या मंडपांच्या परिसरात धातुशोधक यंत्रे (मेटल डिटेक्‍टर) बसविले जाणार आहेत. बंदोबस्ताच्या आखणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरामध्ये नोंदणीकृत तीन हजार २४५ इतके सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

‘सीसीटीव्ही’द्वारे वॉच
शहर व उपनगरामध्ये सरकारच्या वतीने १ हजार २४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विशेषतः वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस दलाकडून व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांना ‘सी वॉच’ या उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ‘सीवॉच’द्वारे खासगी पातळीवर तीस हजारांहून अधिक सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याद्वारे लक्ष्य ठेवले जाणार आहे. संशयित व्यक्ती, बेवारस वस्तू आढळल्यास पोलिस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक- १०० किंवा ०२०-२६१२६२९६,२६१२८८०) संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.