Home ताज्या बातम्या गणेश भक्तांच्या वाहतूक सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज वाहतूक व्यवस्थेची नियोजनबद्ध आखणी

गणेश भक्तांच्या वाहतूक सुरक्षेसाठी रायगड पोलीस सज्ज वाहतूक व्यवस्थेची नियोजनबद्ध आखणी

0

बोरघर ( माणगांव) 🙁 विश्वास गायकवाड) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 तसेच पालीफाटा (खोपोली) वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 (ए) वरून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, पुणे इत्यादी ठिकाणाहून रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे गणेशोत्सवास जाण्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासीय गणेशभक्त आपल्या गावी जात असतात. सर्व गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत वाहतुकीचे नियमन व नियंत्रण सुलभ व्हावे म्हणून वाहतूक बंदोबस्ताची नियोजन बद्ध आखणी करण्यात आली असून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक मा.सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 06 उप विभागीय पोलीस अधिकारी, 13 पोलीस निरीक्षक, 20 सहा.पोलीस निरीक्षक/ पोलीस उप निरीक्षक, 384 पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली असून 10 वाहतूक मदत केंद्रावर क्रेन, अॅम्ब्यूलंस तयार ठेवण्यात येणार असून नादुरुस्त वाहने तात्काळ बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. तसेच महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणी बॅरीकेटिंग करण्यात आले असून गणेश भक्तांचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून ठिक-ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. गणेश भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून 100 स्वयंमसेवक नेमण्यात आले असून वाहतुकीच्या नियमांची काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्रौ गस्तीकरिता असणा-या पोलीस कर्मचा-यांस रिफ्लेक्टर जॅकेटस, लीडबॅटनर्स व बंदोबस्ताकरिता असलेल्या सर्व पोलीस कर्मचा-यास रेनकोटचे वाटप करण्यात आलेले आहे.

रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 02141/228473, मोबाईल फोन नंबर 7447711110 व जिल्हा वाहतूक शाखा रायगड क्रमांक 02141/220015 हे सतत कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.