गरजूंना घरकुलांसाठी भुखंड तात्काळ उपलब्ध करुन द्यावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 30 : नांदगाव खंडेश्वर अंतर्गत गावठाणात राहणाऱ्या गरजू तसेच घरकुल प्रतिक्षा यादीतील पात्र लाभार्थी कुटूंबियांना घरकुलांसाठी तात्काळ भुखंड उपलब्ध करुन देण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
चांदूर रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात नगर परिषद चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक व मुख्याधिकारी यांच्यासमवेत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.
आढावा बैठकीला आमदार प्रताप अडसड, माजी आमदार विरेंद्र जगताप, उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक इब्राहिम चौधरी, आनंद उरकुडे, चांदूर रेल्वेच्या तहसीलदार सुधाकर अनासने, नायब तहसीलदार मनिषा मांजरखेडे आदी उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत आगीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून त्यात जिवीतहानी, मालमत्तेचे नुकसान होवू नये यासाठी आग प्रतिबंधक दक्षता घेणे महत्वाचे आहे. नांदगाव खंडेश्वर येथील नगरपंचायतीत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अग्नीशमन दलाची गाडी प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. तसेच येथील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी चांदी प्रकल्पाकरीता एक्सप्रेस फिडरची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव सादर करण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
धामणगाव रेल्वे नगर परिषदेत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत शाळांची दुरुस्ती, विद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अद्ययावत व्यायाम शाळांची निर्मिती, पुतळा सौंदर्यीकरण, सिमेंट रोडची निर्मिती, नाली बांधकाम आदी कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात यावी अशा सुचना श्रीमती ठाकूर यांनी दिल्या.
चांदूर रेल्वे येथील विशेष रस्ता निधी, वैशिष्ट्य पूर्ण कामांसाठी विशेष अनुदान, नगरोत्थान निधी, नागरी दलित्तेतर निधी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती नागरी सुधारणा योजनेंतर्गत व विविध योजनेतून प्राप्त निधीतून करण्यात येणाऱ्या प्रस्तावित कामांची माहिती श्रीमती ठाकूर यांनी यावेळी घेतली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत घन कचरा प्रक्रिया केंद्र तयार करण्याच्या कामाकरीता मंजूरी देण्यात आली असून त्याबाबतचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे. नगारोत्थान अनुदानांतर्गत हिंन्दू स्मशानभूमि विकसीत करून तेथील परिसराच्या सौंदर्यीकरणाचे काम, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नाली बांधकाम, रस्ता सुधारणांची कामे, स्वच्छता गृहांची निर्मिती आदी नागरी सुविधांची कामे प्राधान्याने करण्यात यावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
00000