Home बातम्या गरबा सुरू असतानाच नाल्यावरील स्लॅब कोसळला, उरण येथील दुर्घटना

गरबा सुरू असतानाच नाल्यावरील स्लॅब कोसळला, उरण येथील दुर्घटना

0

उरण: तालुक्यातील नवापाडा-करंजा येथील हनुमान मंदिरात समोरील प्रांगणात शनिवारी रात्री गरबा-दांडीया नृत्य सुरू असतानाच मंदिरा समोरच असलेला नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळला.या नाल्याच्या स्लॅबवरच गरब्याचा आनंद लुटण्यासाठी या स्लॅबवरच बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र सुदैवाने कोणतीही अप्रिय घडली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

तालुक्यातील नवापाडा-करंजा येथील हनुमान मंदिरात समोर असलेल्या नाल्यावर राजिपच्या उरण पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनोहर कोळी यांच्या घरापासून साधारणतः सहा फूट रुंद आणि 80-100 फुट लांबीचा स्लॅब टाकण्यात आला आहे. नाल्यावरील या स्लॅबचा वापर परिसरातील नागरिकांकडून नेहमीच पुलासारखा केला जातो. याच हनुमान मंदिराच्या समोर दरवर्षी नवरात्रौत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या भव्य प्रांगणातच मोठ्या प्रमाणात गरबा-दांडिया नृत्याचाही कार्यक्रम आयोजित केला जातो.

देवी दर्शन आणि गरबा-दांडिया नृत्याचा आनंद लुटण्यासाठी परिसरातील नागरिकांची दसऱ्यापर्यंत खूप गर्दी असते. शनिवारी रात्रीच्या सुमारास गरबा नृत्य पाहण्यासाठी स्लॅबवरच बघ्यांनी गर्दी केली होती. मात्र अचानक नाल्यावरील स्लॅब कोसळल्याने सर्वांचीच चांगलीच पळापळ झाली. सुदैवाने कोणतीही अप्रिय घडली नसल्याने आणि कोणासही दुखापत झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र चार-पाच वर्षांपूर्वीच उभारण्यात आलेल्या स्लॅबच्या कामाच्या दर्जाबद्दल येथील नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.