Home बातम्या ऐतिहासिक गांधीजींचा अहिंसात्मक लढा जगभर पोहोचला – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

गांधीजींचा अहिंसात्मक लढा जगभर पोहोचला – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

0
गांधीजींचा अहिंसात्मक लढा जगभर पोहोचला – जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार

वर्धा, दि. 15 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशात स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. सेवाग्रामचा या चळवळीत मोलाचा सहभाग आहे. गांधीजींचा स्वातंत्र्य प्राप्तीचा अहिंसात्मक लढा जगभर पोहोचला. अनेक देशांना या चळवळीतूनच स्वातंत्र्य मिळाले. अमेरिकेतील वंशवादाविरोधात लढल्या गेलेल्या लढयाचे प्रेरणास्थान देखील महात्मा गांधीच होते, असे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या वर्धापण दिनानिमित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी शुभेच्छापर संदेश देतांना त्या बोलत होत्या. यावेळी आ.रामदास आंबटकर, आ.पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी डा.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनोज कुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने विकासाच्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. जिल्हयात सुध्दा विकासाच्या बाबतीत आपण मार्गक्रमण करतो आहे. मानवविकास निर्देशांकात जिल्हयाची स्थिती चांगली आहे. यात आपण राष्ट्रीय सरासरी इतक्या वर आहोत. 222 कोटी रुपयांचा जिल्हा नियोजन समितीचा आढावा आपण राबवित असून गांधी एक अनुभूती या नवीन उपक्रमासह 244 कोटी रुपयांचा सेवाग्राम विकास आराखडा राबविल्या जात आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राबवित असतांना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी नागरिकांना डिजिटल नकाशे, सातबारा संगणकीकरण, स्पर्धा परीक्षा शिबिर, ई-फेरफार यासाह विविध प्रकारच्या स्पर्धा आपण घेतल्या. पुढील 15 ऑगस्ट पर्यंत याच उत्साहात हा महोत्सव आपणास साजरा करावयाचा आहे. दरम्यानच्या काळात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान आपल्याला सहन करावे लागले. आपल्या स्तरावर देय असलेली मदत आपण तातडीने नुकसान ग्रस्तांना केली आहे. एकही पाप्त शेतकरी पिककर्जा पासुन वंचित राहू नये यासाठी आपण विशेष काळजी घेतोय. यावर्षी 510 कोटीचे पिककर्जाचे वाटप आपण केले आहे.

जिल्हा कारागृहात काही अंडरट्रायल कैदी असतात त्यांना बाहेर पडल्यानंतर स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कारागृहातच त्यांना आपण कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतो आहे. प्रत्येकाला निकषाप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी 493 गावात पाणी पुरवठयाची कामे करणार असून त्यासाठी 181 कोटीचा आराखडा आपण मंजूर केला आहे. प्रत्येकाला विज कनेक्शन देण्याचे धोरण असून आपल्याकडे प्रत्येक गावात वीज जोडणी पोहोचली आहे.

कोरोनाचा आपल्या जिल्हयाने शूरपणे सामना केला. सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना विरुध्दची लढाई लढू शकलो. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत आपण सलग दुस-या वर्षी अव्वल क्रमांक मिळविला आहे. बचत गटांना 196 कोटीचे वाटप करुन यातही आपण अव्वल आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत राज्यात तिसरा तर विभागात प्रथम क्रमांक आपण मिळविला. महिला गटांच्या उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी वर्धा येथे वर्धिनी मॉल सुरु केला असून हिंगणघाट व आर्वी येथेही लवकरच सुरु होईल. असा मॉल सुरु करणारा देखील वर्धा पहिला जिल्हा आहे.

ग्रामिण नागरिकांना मालमत्ता पत्रक व नकाशे सहजतेने उपलब्ध होण्यासाठी स्वामित्व योजना राबविली जात आहे. शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजने अंतर्गत 53 हजार शेतक-यांना 470 कोटीची कर्ज माफी देण्यात आली. नागरिकांना कालमर्यांदेत सेवा उपलब्ध होण्यासाठी महसूलच्या 90 तर शिक्षण विभागाच्या 105 सेवा आपण लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत आणल्या आहे. दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाभर आपण शिबिराचे आयोजन केले आहे. अधिकाअधिक लोकांपर्यत पोहोचून त्यांना दिलासा देण्याचे आपले प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते तिरंगाच्या तीन रंगांचे फुगे आकाशात सोडण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचा-यांचा गौरव देखील करण्यात आला. तसेच काही पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले. कार्यक्रमास माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

000

जिल्हाधिका-यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्काराचे वितरण

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापण दिनानिमित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. काही अधिकारी कर्मचारी यांचा उत्कृष्ठ कामासाठी गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिका-यांसह आ.रामदास आंबटकर, आ.पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी डा.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनोज कुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ठ कामासाठी जिल्हाधिका-यांच्या हस्ते पोलिस निरिक्षक महेश मुंढे, सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष शेगावकर, हवालदार रमेश केवटे, गणेश खेवले, निर्भय कुवर, पोलिस नाईक विनोद काबंळे, महिला पोलिस अमलदार सिमा दुबे यांना पोलिस महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात आले.

आंतरराज्य दरोडेखोरांवर कारवाई केल्याच्या उत्कृष्ठ कामासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, दिनेश कदम, पोलिस निरिक्षक संजय गायकवाड, प्रशांत काळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र इंगळे , पोलिस निरिक्षक अमोल लगड, हवालदार गजानन लामसे, राजेश तिवसकर, अरविंद येनुरकर, दिनेश बोथकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. पुरपरिस्थितीत बचाव पथकातील उत्कृष्ठ कामासाठी पोलिस अमलदार भुषण दांडेकर, संतोष लोहाटे, अनिरुध्द जाधव, समिर आगे, अजेश राठोड, अमर ढाकुलकर, सौरभ अंबुडारे, अरविंद इंगोले यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विरमाता व वीर पत्नीचाही सत्कार करण्यात आला. त्यात वीरमाता शांताबाई वरहारे, वीरपत्नी नलीनी टिपले, वीरपत्नी जयश्री चौधरी यांचा समावेश आहे. जिल्हा होमगार्ड कार्यालयातील हवालदार निदेशक राम पिंजरकर यांना गूणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती यांचे पदक जाहिर करण्यात आले. त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मे प्रतिक्षा इंडस्ट्रिजचे संचालक प्रविण हिवरे, मे. चिंतामणी गृह उद्योगच्या संचालक रिता सोनछात्रा तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरीसाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वैभव लहाने, उद्योग निरिक्षक प्रविण रंगारी, महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उत्कृष्ठ कामासाठी कस्तुरबा हॉस्पीटल, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुणालय सावंगी मेघे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत उत्कृष्ट कामासाठी जिल्हा अग्रणी बँक व कृषी सहाय्यक सुबोध मानकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हयातील राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये सहभाग नोंदविलेल्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना राज्यपालाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. त्यात वंश वैद, ऋतुजा डंभारे, शिरीष अरबट, हर्षिता बोस, प्रियंका मरस्कोल्हे व भांडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

000

आमदार रामदास आंबटकर यांच्याहस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार स्थानिक विकास निधीतून आ.रामदास आंबटकर यांनी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या असून त्याचे लोकार्पण मुख्य ध्वजारोहण समारंभानंतर जिल्हा क्रिडा संकुलाच्या आवारात करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डा.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनोज कुमार खैरनार, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर, याच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते.

यारुग्णवाहिका स्थानिक आरोग्य विभागास रुग्णांच्या सेवेसाठी सुपुर्द करण्यात आल्या. यामुळे रुग्णकल्याणाच्या कामाला गती मिळेल असे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

000