Home बातम्या गाड्या रद्द, रेल्वेने प्रवाशांचे १३ कोटी केले परत

गाड्या रद्द, रेल्वेने प्रवाशांचे १३ कोटी केले परत

0

मुंबईः जुलै आणि ऑगस्टमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वेला गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. मध्य रेल्वेला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे परत केले असून यासाठी मध्य रेल्वेने ३६.७ लाख प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत केले आहे. 
जुलैच्या शेवटच्या तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने रेल्वे रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस तसेच लोकल रद्द कराव्या लागल्या होत्या. गाड्या रद्द कराव्या लागल्याने उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांना १३ कोटी रुपये परत दिल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. जुलैमध्ये ६ हजार ३२२ उपनगरीय सेवा बंद करण्यात आली होती. तर ऑगस्टमध्ये २ हजार ६८९ सेवा बंद करण्यात आली होती. जुलैमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या ३४८ तर ऑगस्टमध्ये ५७५ सेवा रद्द कराव्या लागल्या होत्या. 

मुंबई-पुणे रेल्वेमार्ग ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट बंद ठेवण्यात आला होता. जुलै महिन्यात मध्य रेल्वेला मोठा फटका बसला होता. उपनगरीय आणि लांब पल्ल्याची सेवा जवळपास १६ तास बंद ठेवण्यात आली होती. २८ जुलै रोजी बदलापूरला रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि नौदलाला पाचारण करण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी सेवा २० तास ठप्प झाली होती.