गारगाई धरणाच्या वन्यजीव व पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी – महासंवाद

गारगाई धरणाच्या वन्यजीव व पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि.१७ :- मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करावेत. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीला वन मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रधान मुख्य वन संरक्षक(वनबल) शोमिता बिश्वास,  प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वाढत्या मुंबईतील लोकसंख्येसाठी गारगाई प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पासाठी 844.879. हेक्टर जमीन वळतीकरण प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांसाठी अतिरिक्त पिण्याचे पाणी मिळणार आहे. गारगाई धरणाचे काम पूर्णत्वाला जाण्यासाठी वन विभागाने वन्यजीव व पर्यावरण विषयक परवाने अटींच्या पूर्ततेच्या अधिन राहून द्याव्यात. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रुटीविरहीत प्रस्ताव सादर करून तातडीने वन्यजीव व पर्यावरण विषयक मंजुरी घ्याव्यात जेणेकरून गारगाई धरणाच्या कामास गती येईल.

संरक्षित क्षेत्र व पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांचे राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने शिफारस केलेले  प्रस्ताव मार्गी लावण्यासंदर्भात या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करावेत. या व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित कराव्यात. पायाभूत सुविधा, प्रकल्पांसाठी संपादित केलेल्या वन जमिनीच्या बदल्यात व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील व्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी स्वेच्छा संपादित करून वनीकरणासाठी घेण्यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनाईवाडी येथील गावकऱ्यांच्या सात-बारा वरील वनविभागाचे संपादन शेरे कमी करणे, जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात तरंगता सौर उर्जा प्रकल्पाकरीता मान्यता यासह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांना या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

000000

- Advertisement -