गाळणेच्या नवादे वस्तीवर माणुसकीचा दीप उजळला! – महासंवाद

    - Advertisement -

    नाशिक, दि. १० (जिमाका): दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर माणसा-माणसांतील नाती उजळविण्याचा, आनंद वाटण्याचा आणि आपुलकीची ऊब देण्याचा सण! समाजातील शेवटच्या घटकाच्या चेहऱ्यावरही आनंद फुलावा, प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा दीप उजळावा, या संवेदनशील भावनेतून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील गाळणे येथील नवादे वस्तीला भेट देत आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेत आणि स्थानिकांशी अहिराणी भाषेतून संवाद साधत त्यांनी आपुलकीचा नवा दीप उजळविला. दुष्काळाचे सावट असले, तरी समाजातील प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा, हाच आपला संकल्प असल्याची भावना व्यक्त करत संकटाच्या काळात राज्य शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

    दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सणाचा आनंद कोणापासूनही हिरावला जाऊ नये, हीच या भेटीमागील संवेदनशील भूमिका होती. मंत्री भुसे यांनी नवादे वस्तीवरील आदिवासी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि परिस्थिती जाणून घेतली. केवळ औपचारिक भेट न ठेवता त्यांच्यासोबत स्नेहभोजन करून सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अशा भेटींमधून अधिक दृढ होत असते, याची प्रचिती यावेळी आली.

    संकटकाळात शासन खंबीरपणे पाठीशी!

    निसर्गाच्या लहरीपणामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करताना नागरिकांनी खचून जाऊ नये. राज्य शासन प्रत्येक संकटाच्या काळात आदिवासी बांधवांसह सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. दुष्काळाचे सावट असले तरी प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचला पाहिजे. समाजातील कोणताही घटक सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये, हाच आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

    अंगणवाडीत चिमुकल्यांच्या कवितांनी फुलविला आनंद!

    नवादे वस्तीवरील अंगणवाडी केंद्राला भेट देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य, उत्साह आणि उत्सुकता अनुभवताना त्यांनी मुलांशी आस्थेने गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांनी गोड आवाजात कविता सादर केल्या. त्यांच्या छोटेखानी सादरीकरणाला मंत्री भुसे यांनी उत्स्फूर्त दाद दिली. बालपणातील या निरागस क्षणांनी दिवाळीच्या भेटीला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाला.

    अहिराणीच्या गोडव्यातून जुळली आपुलकीची नाळ!

    गाळणे येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री भुसे यांनी गावातील विविध प्रश्न, स्थानिकांच्या अडचणी आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. ग्रामविकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. विशेष म्हणजे, स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी अहिराणी भाषेचाही सहज वापर केला. आपल्या मातीतील भाषेतून साधलेला हा संवाद ग्रामस्थांच्या मनाला भावणारा ठरला. भाषेतील आपलेपणा आणि संवादातील सहजता यामुळे ग्रामस्थांशी एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले.

    दिवाळीच्या प्रकाशात सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    एखाद्या वस्तीला दिलेली भेट ही केवळ कार्यक्रमाची औपचारिकता नसते, तर तेथील माणसांच्या आयुष्यात डोकावण्याची, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यांना विश्वास देण्याची संधी असते. नवादे वस्तीवरील दिवाळीचा हा स्नेहसोहळा त्याच सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरला.

    सण-उत्सवांचा खरा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन साजरा करण्यात असतो. दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचा आणि शासन आपल्या पाठीशी असल्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न मंत्री दादाजी भुसे यांच्या या भेटीतून झाला.

    दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा, आनंदाचा क्षण प्रत्येकाच्या वाट्याला यावा आणि माणुसकीची ऊब समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, हाच नवादे वस्तीवरील या दिवाळी भेटीचा खरा संदेश ठरला!

    ०००

    विशेष वृत्त

    विलास बोडके, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक

    - Advertisement -