
मुंबई. दि. ०९ : राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना २’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात मंत्रालयात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनच्या अमित चंद्रा यांना पत्र लिहून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेमध्ये सक्रीयपणे सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीस मान देऊन ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशनने या योजनेसाठी हा सामंजस्य करार केला आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री फडणवीस यांची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने फाउंडेशनला सर्वते सहकार्य करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाला दिल्या आहेत.
या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. फाउंडेशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच फाउंडेशनमार्फत स्वयंसेवी संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवीनी ग्रामीण ॲप संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना हा राज्यातील जलसंधारण प्रकल्प आहे. यामध्ये धरणे व तलाव गाळमुक्त करुन तो गाळ शेत जमिनीमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होते आणि जमिनीची सुपिकताही वाढते. गेल्या दोन वर्षात राज्यात दीड हजारपेक्षा जास्त जलस्त्रोतातून सुमारे साडेचार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांनी हा गाळ वाहून नेला आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ कोटी घनमीटर गाळ उपसण्याची क्षमता असून १.८ लाखांहून अधिक शेतकरी गाळ वाहून नेणार आहेत. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही एक अभिनव योजना असून फिलॅन्ट्रॉपीक संस्था, शासकीय विभाग आणि स्थानिक समुदाय यांना एकत्र आणते, हा एक मोठा सहभागात्मक उपक्रम आहे.
या सामंजस्य करारावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव हरीभाऊ गीते, अवर सचिव प्रकाश पाटील यांच्यासह ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे गायत्री नायर लोबो, अमृता के आदी उपस्थित होते.
०००