अमरावती, दि. 08 :- चिखलदरा येथील गाविलगड परिसरात आगीमुळे वनाचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, तसेच नुकसानग्रस्त भागात पुन्हा झाडे लावून हिरवाई निर्माण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
चिखलदरा येथे गाविलगड परिसरात आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि.प अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुर्घटनेची कारणमीमांसा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. नेमके किती नुकसान झाले हे तपासावे. आवश्यक तिथे कारवाई व्हावी त्याचप्रमाणे, येथे पुन्हा हिरवाई निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हावी. ही कामे ‘मनरेगा’च्या माध्यमातून राबवावीत जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळू शकेल. या दृष्टीने आवश्यक कामांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यापुढे पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाने काटेकोर तपासणी, नियंत्रण व आवश्यक कार्यवाही नियमितपणे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.