Home ताज्या बातम्या गीतेतील कर्मयोग जगणारा ‘योद्धा’

गीतेतील कर्मयोग जगणारा ‘योद्धा’

0

पुणे : सज्जनांचे पाठीराखे, दुर्जनांचा कर्दनकाळ, पोलिसांसाठी झटणारे आणि त्यांच्यासाठी संघर्ष करत प्रसंगी आपल्या नोकरीचाही राजीनामा देणारे, आईनंतर गीताच आपले सर्वस्व, असे मानणारे साहित्य, अध्यात्मात रमणारे, गीतेतील कर्मयोग जगणारा योद्धा अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आठवणी जागविल्या.
अरविंद इनामदार यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले़. पुणे पोलीस, पोलीस संशोधन केंद्र, अरविंद इनामदार फाउंडेशन यांच्या वतीने मंगळवारी पोलीस संशोधन केंद्रात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते़. या वेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ़. के. व्यंकटेशम, सीआयडीचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, बिनतारी संदेश विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, भय्यासाहेब इनामदार, जयंत इनामदार आणि अरविंद इनामदार फाउंडेशनचे विश्वस्त डॉ़ सागर देशपांडे उपस्थित होते़.
यावेळी इनामदार यांचे मोठे बंधू भय्यासाहेब इनामदार यांचे मनोगत जयंत इनामदार यांनी वाचून दाखविले़. माजी पोलीस महासंचालक कृष्णन, अतुलचंद्र कुलकर्णी, डॉ़ सागर देशपांडे, मोहन यादव, संस्कृत तज्ञ डॉ़ श्रीकांत बहुलकर, हिम्मतराव देशभत्तार, राजेंद्र ढमाळ, रमेश पंढरपूर यांनी इनामदारांच्या आठवणी सांगितल्या़. सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सूत्रसंचालन केले़. 
……..
…ते १० रुपये अजून जपून ठेवले…
निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटनेचे विद्याधर दडके यांनी सांगितले की, इनामदार यांना पैजा लावण्याची सवय होती़. पोलीस अधिकारी कमलाकर यांच्या मिशा पाहून त्यांनी ‘सांगते ऐका’च्या पाटलासारखा असल्याचे सांगितले़ तो अभिनेता कोण, यावर त्यांनी माझ्याशी पैज लावली़. पैज मी जिंकल्यावर त्यांनी मला १० रुपये दिले़. ते १० रुपये मी अजून जपून ठेवले आहेत़.
…..
स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम
निवृत्त पोलीस महासंचालक वसंतराव सराफ यांनी सांगितले की, मुंबई पोलीस आयुक्त असताना इनामदार अतिरिक्त पोलीस आयुक्त होते़. त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम होता़. एकदा मला गृह खात्यातून फोन आला़. तुम्ही अजून इनामदारांच्या बदलीची मागणी केली नाही़. 
…….
जे आजवर जेथे होते, तेथील घटकप्रमुख काही महिन्यांत त्यांच्या बदलीची मागणी करीत असल्याचे मला सांगितले़. मी त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले़.  त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा प्रॉब्लेम असल्याचे सांगून सराफ म्हणाले, एकदा शरद पवार यांनी विचारले की, अरविंद इनामदार असे का बोलतात़, तेव्हा मी त्यांना सांगितले होते की, जे पोलीस अधिकारी, कर्मचारी बोलू शकत नाही़ त्यांच्या मनातले इनामदार बोलतात़.
………..
महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षकांच्या बढतीमध्ये खूप वर्षे जातात़ त्यावर त्यांनी मध्यम मार्ग काढून सहायक पोलीस निरीक्षक हे पद निर्माण केले़ एकदा त्यांनी आपल्याला तुमची बदली करणार, असे सांगितले़. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बसून वाद घालून ही बदली रद्द करविली़. आपण प्रतिनियुक्तीसाठी अर्ज केला होता़; पण तो त्यांनी नाकारला़ तो का नाकारला, याचे कारण त्यांनी ३ वर्षांनी सांगताना ते म्हणाले, मला चांगले अधिकारी पाहिजेत म्हणून तुमचा अर्ज नाकारला़. ते आपल्या कनिष्ठ अधिकाºयांची संपूर्ण माहिती घेऊन नंतरच ते बोलत असत़- डॉ़. के़. व्यंकटेशम.