गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आणि आयआयटी, मुंबई यांच्यात सामंजस्य करार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आणि आयआयटी, मुंबई यांच्यात सामंजस्य करार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- Advertisement -

मुंबई, दि. 2 : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित पदवी संस्थांमधील अध्यापक तसेच विद्यार्थ्यांना आयआयटी, मुंबई येथील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळावे आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवता यावेत, यासाठी तंत्र शिक्षण संचालनालय आणि आयआयटी, मुंबई यांच्यात आयआयटी पवई येथे सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

            मंत्री श्री. पाटील म्हणाले, आयआयटी, मुंबई येथील संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करण्याच्या उद्देश्याने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. तंत्रशिक्षण संस्थांमधील अध्यापन, अध्ययन व संशोधन विकास व विस्तार या बाबींसाठी जागतिक दर्जाच्या आयआयटी, मुंबई या संस्थेचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच संस्थामधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.

             या सामंजस्य करारावर तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी व आयआयटी मुंबई तर्फे   डॉ. मिलिंद अत्रे (अधिष्ठाता-संशोधन आणि विकास)  यांनी स्वाक्षरी केली. 

            यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, डॉ. सचिन पटवर्धन, डॉ. अनिल नांदगांवकर, डॉ. मिलिंद अत्रे  व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सामंजस्य करारातील ठळक बाबी –

विद्यार्थ्यांसाठी

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील 15 शासकीय व अनुदानित संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करुन देणे.

आयआयटी मुंबई येथील पायाभूत सुविधा (Lab / Library) इ. चा वापर, उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन करणे.

 तज्ज्ञ अध्यापकांद्वारे व्याख्याने आयोजित करणे, संशोधन व विकास (Research & Development) सुविधांचा वापर करणे अशा विद्यार्थी केंद्रित बाबींचा या सामंजस्य करारात अंतर्भाव आहे.

अध्यापकांसाठी :

            आयआयटी मुंबई यांच्या विद्यमान धोरणांनुसार शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी संस्थांमधील शिक्षकवर्गासाठी व्यावसायिक प्रशिक्षण/कार्यक्रम, कार्यशाळा, आयआयटी येथील प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, यांचा वापर करणे.

 संशोधन व विकास कामांमध्ये मदत

            राज्य शासन आणि  केंद्र शासन यांच्या विविध योजनेंतर्गत निधी सहाय्यासाठी संशोधन आणि विकास प्रस्ताव तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रस्तावाची आयआयटी येथील तज्ञांद्वारे  छाननी करणे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

- Advertisement -