Home शहरे मुंबई गुरूवर्य कै. बापू घरत उद्यान नामकरण संपन्न

गुरूवर्य कै. बापू घरत उद्यान नामकरण संपन्न

 नवी मुंबई या मूळच्या ठाणे बेलापूर पट्टीत संस्कारक्षम पिढी घडविण्याचे व त्यातही पुढच्या पिढ्या घडविणारे अनेक शिक्षक घडविण्याचे काम ज्या शिक्षकाने केले अशा गुरूवर्य बापू घरत गुरूजींच्या स्मृती या उद्यानाच्या नामकरणातून जपल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी माझ्या शिक्षक वडिलांचे शिक्षक असलेल्या घरत गुरूजींचे नामकरण उद्यानाला करण्याचे भाग्य मला लाभले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. सी.बी.डी. सेक्टर 4 येथील सी-5,8,9 च्या बाजूस असलेल्या उद्यानास गुरूवर्य कै. बापू गोकुळ घरत गुरूजी उद्यान नामकरण समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

      यावेळी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, प्रस्ताव सूचक स्थानिक नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्री. अशोक गुरखे व श्रीम. अनिता मानवतकर, विभाग अधिकारी श्री. शशिकांत तांडेल, उपअभियंता श्री. पंढरीनाथ चौडे आणि घरत गुरूजींचे कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.

      आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी बोलताना नवी मुंबईच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणा-या घरत गुरूजींच्या उद्यान नामकरणातून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याला आदरांजली अर्पण केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या नामफलकाव्दारे एक चांगला आदर्श सतत लोकांच्या नजरेसमोर राहील असे गौरवोद्गार काढले.      ज्ञानदानाचे काम शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून 38 वर्षे निष्ठेने करणा-या कै. बापू गोपाळ घरत गुरूजींच्या शैक्षणिक कारकिर्दीचा गौरव महाराष्ट्र शासनाने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून केला होता. शिक्षण, क्रीडा, संगीत आणि सामाजिक कार्य हे गुरूजींचे अत्यंत आवडीचे विषय होते. शिरवणे व नेरूळ परिसरात त्याकाळी अस्पृश्यता निवारणाचे काम घरत गुरूजींनी अत्यंत मनोभावे केले. येथील मूळ भूमीपुत्र शेतक-यांचे संघटक म्हणून न्याय व हक्कांसाठी आंदोलने उभारण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. त्यांनी बेलापूर व बेलपाडा गांव अशी आदिवासी संघटना उभारली आणि न्याय व हक्काचा लढा दिला. ‘कामाला लागलात तरी शिक्षण सोडू नका’, ही त्यांची आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी शिकवण होती. समाजातील ज्या घटकांना इंग्रजी शिक्षण घेता येत नाही त्यांची अडचण लक्षात घेऊन गुरूजींनी पुढाकार घेत बेलपाडा येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. अशा शैक्षणिक विकासासाठी सदैव तत्पर आणि सक्रीय असणा-या गुरूवर्यांच्या उद्यान नामकरण समारंभप्रसंगी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते