सॅनफ्रॅन्सिस्को : फेसबुक आणि गूगलला ‘डेटा’ पुरविणाऱ्या कार्यप्रणालींमुळे (बिजनेस मॉडेल) मानवाधिकार धोक्यात येत असल्याचे निरीक्षण एका अहवालातून समोर आले आहे. ‘अॅमेन्स्टी इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे निरीक्षण मांडले आहे. विविध ऑनलाइन सेवा व पैसे कमावण्याच्या जाहिरातींचे यूजरना आमिष दाखविले जाते. त्या सेवांचा ‘यूजर’ने स्वीकार केल्यावर त्याचा ‘डेटा’ गोळा केला जातो, असे करणे हे ‘यूजर’च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोक्यात आणणारे आहे. यामुळे ग्राहकाच्या अधिकारांची पायमल्ली होते, असा दावादेखील ‘अॅमेन्स्टी इंटरनॅशनल’ने केला आहे. फेसबुक आणि गूगलला ‘डेटा’ पुरविणाऱ्या कार्यप्रणालींमुळे ‘यूजर’च्या गोपनीयतेच्या अधिकाराला धक्का पोहोचतो आहे. आपल्या डिजिटल जीवनावर त्यांचे प्रभावी नियंत्रण आहे. हेच आपल्या मानवाधिकारांसमोरील खूप मोठे आव्हान आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘अब्जावधी लोकांच्या खासगी माहितीचा वापर करून गूगल आणि फेसबुक या कंपन्या प्रचंड मोठी कमाई करीत आहेत. आपल्या आधुनिक जीवनपद्धतीवर त्यांनी खूप मोठा प्रभाव टाकला आहे,’ असे ‘अॅमेन्स्टी इंटरनॅशनल’चे सरचिटणीस कुमी नैदू यांनी सांगितले.
गूगल, फेसबुकमुळे मानवाधिकार धोक्यात
- Advertisement -