Home ताज्या बातम्या गॅस गळतीने झालेल्या स्फोटात 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, दोन जण जखमी

गॅस गळतीने झालेल्या स्फोटात 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, दोन जण जखमी

0

पुणे: पुण्यातील खराडी येथे सोमवारी (27 जानेवारी) सकाळी गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला असून आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास खराडीमधील संभाजीनगर येथे ही घटना घडली. यामध्ये स्वराली भवाळे (सहा महिने) या बाळाचा मृत्यू झाला आहे. तर शंकर भवाळे (२८), आशाताई शंकर भवाळे ( २२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील संभाजीनगरमध्ये शंकर भवाळे हे आपल्या पत्नी व लहान मुलीसह घरात झोपले होते. रात्री गॅस गळती होऊन तो गॅस स्वयंपाक घरात पसरला होता. सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या. पाणी तापविण्यासाठी त्यांनी लाईट लावण्यासाठी बटण दाबले. त्याबरोबर मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे चार खोल्यांवरील पत्रे उडाले. 

स्वयंपाकाच्या ओटावरील गॅस शेगडीवर वरच्या बाजूचे भिंतीच्या वरच्या भागातील सिमेंट पडले. शेगडी पूर्ण वाकडी झाली आहे. गॅस सिलेंडर व्यवस्थित आहे. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व कपडे व इतर साहित्य जळून गेले. अग्निशामक दलाने ही आग तातडीने विझविली. या आगीत घरातील तिघेही जखमी झाले असून सहा महिन्यांची स्वराली गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.