Home ताज्या बातम्या गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर

गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर

पुणे : पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण काही केल्याने कमी होताना दिसत नाही. त्यातच, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. 30 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक असल्याचं आढळून आलं आहे. देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. गेल्या महिनाभरापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,828 असून मृतांच्या संख्येने शतक गाठलं आहे. त्यापैकी 93 मृत हे एकट्या पुणे शहरातील आहेत. दुसरीकडे पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1611 इतकी झाली आहे. मृतांची संख्या वाढल्याने पुण्याचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.

पुण्याचा मृत्यूदर किती?

पुण्याचा मृत्यूदर 30 एप्रिलपर्यंत 5.6 टक्के होता. तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 4.4 टक्के आणि देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के होता. म्हणजेच देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर जास्त आहे. पुण्याचा मृत्यूदर राज्यासह देशात सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण 33 हजार 50 कोरोना रुग्ण असून त्यापैकी 1,074 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 9 हजार 915 कोरोनाचे रुग्ण असून 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात एकूण 1,518 कोरोनाचे रुग्ण असून आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारांच्या पार 

महाराष्ट्रात 1 मे रोजी एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.