मुंबई, दि. 13 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. हे विद्यापीठ आदिवासी भागातील असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी गोंडवाना विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी आदिवासी विकास मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आज मंत्रालयात गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ आणि सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांच्या कामांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठांमध्ये परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत बांधकामालाही प्राधान्य देण्यात येईल. तसेच सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्रासाठी चार कोटींचा निधी देण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत बाधकामासही प्राधान्याने निधी देण्यात येईल. असे मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत सांगितले .
000000
काशिबाई थोरात/विसंअ/13.9.22