Home शहरे अहमदनगर गोदावरी नदीला पूर;२० गावांना धोका

गोदावरी नदीला पूर;२० गावांना धोका

0

 नगर:

गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नगर जिल्ह्यातील नदीकाठची वीस गावे व एका आश्रमातील मिळून तब्बल दोन हजार १४३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या चार तालुक्यांतील गावांचा यामध्ये समावेश आहे. सोमवारी सकाळनंतर मात्र नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग सातत्याने कमी करण्यात येत होता. त्यामुळे नदीची पाणीपातळी कमी होत असली, तरी पूरपरिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग रविवारी सातत्याने वाढवण्यात येत होता. रविवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तर या बंधाऱ्यातून गोदावरीत दोन लाख ९१ हजार ५२५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता व नेवासा या चार तालुक्यांतील नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले होते. हे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव नगरपालिका हद्दीतील ८५ कुटुंबांतील ३६१ नागरिक व तालुक्यातील सहा गावांमधील ५९ कुटुंबांतील २५९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. याशिवाय राहाता तालुक्यातील रास्तापूर गावातील ८० कुटुंबांतील ३७२ नागरिक व १६० जनावरांचे, शिंगवे गावातील ३८ कुटुंबांतील १८३ नागरिकांचे व ४२ जनावरांचे, पुणतांबा गावातील ७८ कुटुंबांतील ३४० नागरिकांचे, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर आश्रमातील ४५ नागरिकांचे, खाणापूर गावातील ५ कुटुंबांतील ३१ नागरिकांचे, महांकाळ वडगाव येथील १६ कुटुंबांतील ४९ नागरिकांचे व नायगाव येथील ४ कुटुंबांतील १२ नागरिकांचे, नाऊर येथील ५ कुटुंबांतील १६ नागरिकांचे, सरला येथील ४ कुटुंबांतील १० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील २७ कुटुंबांतील १५७ नागरिकांचे, जैनपूर येथील ७५ कुटुंबांतील २६३ नागरिकांचे, सुरेगाव येथील ८ कुटुंबांतील ३२ नागरिकांचे व उस्थळ येथील तीन कुटुंबांतील १३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोमवारी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आल्याने नदीला आलेला पूर ओसरत असला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून सातत्याने नदीपातळीचा आढावा घेण्यात येत होता.