गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड

- Advertisement -

मडगाव : गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहे हे पुन्हा एकदा कळंगूट पोलिसांनी उत्तर गोव्यातील कांदोळी या जगप्रसिद्ध किनारपट्टी भागात केलेल्या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २0११ पासून गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन असलेल्या इफीयानी पाश्कोल ओबी या नायजेरियनाला अटक केली असता त्याच्याकडे ३ कोटींचा अंमलीपदार्थ सापडला. यंदाचा हा सर्वांत मोठा साठा आहे. या घटनेमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसायातील काळीबाजू पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.

मागच्या दहा महिन्यात अंमली पदार्थ व्यवसायात असलेल्या तब्बल ३५ विदेशी नागरिकांना अटक केली असून त्यात सर्वांधिक नायजेरियनांची संख्या सर्वांधिक असून त्यानंतर रशियनांचा नंबर लागतो. आतापर्यंत विदेशी नागरिकांविरोधात झालेल्या कारवाईत तब्बल २१ नायजेरियांना अटक करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ ११ रशियन आरोपी आहेत. केनिया, इटाली व नेपाळ या देशातील प्रत्येकी एक नागरीकांची या व्यवहारात अटक झाली आहे.

कळंगूट पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत अटक केलेल्या ओबी उर्फ आलेक्स हा आरोपी २0११ पासून गोव्यात वास्तव करत असून २0११ साली त्याला अवैधरित्या भारतात वास्तव करुन रहात असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर २0१२ मध्ये त्याला कळंगूट पोलिसांनी कोकेन प्रकरणात अटक केली होती. गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन अंमली पदार्थांचा धंदा चालविणे ही नायजेरियनांची मोडस आॅपरेंडी असून ३0 जानेवारी रोजी कोळंब-काणकोण येथे अशाच प्रकारे जोजम ओबुमा या केनियाच्या संशयिताला अटक करुन त्याच्याकडून २.२५ लाखांचा कोकेन जप्त केला होता. त्यावेळीही हा आरोपी २0११ पासून गोव्यात बेकायदेशीर वास्तव करुन रहात असल्याचे उघडकीस आले होते. यंदा आॅक्टोबर महिन्यातच गिरी-म्हापसा येथे १0 रोजी इजिफोर इमान्यूएल इडोको या ३७ वर्षीय नायजेरियनाला अटक केली असता त्याच्याकडे १२ लाखांचा कोकेन सापडला होता.

त्यापूर्वी १0 सप्टेंबरला शिवोली येथे इफेइयानी ओबिन्ना ४१ व चिडीएब्रो ओनुचुकिओ या दोन नायजेरियांना अटक केली असता त्यांच्याकडे ७.५0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. १३ आॅगस्ट रोजी हरमल येथे केलेल्या कारवाईत अशाचप्रकारे ६ नायजेरियनांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे ४.५0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. मंगळवारी केलेली कारवाई गोव्यातील सर्वांत मोठी कारवाई असली तरी या पूर्वी १९ मे रोजी शिवोली येथे पोलिसांनी धाड घालून चुकुउडी इजेचुकऊ याच्याकडे ५४.५२ लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते.

गोवा पोलिसांनी यंदा केलेल्या कारवाईत रशियनांचाही समावेश असून २४ जानेवारी रोजी शिवोली येथे मार्टिन आकिनोव्ह याला अटक केली असता त्याच्याकडे ४.९0 लाखांचे अंमलीपदार्थ सापडले होते. २९ जानेवारी रोजी मोरजी येथे अ‍ॅलेक्झांडर सेजिनोव्ह या ३0 वर्षीय रशियनाला अटक केली असता त्याच्याकडे दोन लाखांचा एमएमडीए हा अंमलीपदार्थ सापडला होता. २ एप्रिल रोजी आश्वे-पेडणे येथे मॅक्झीम कुसहानी या ३१ वर्षीय रशियनाला अटक केली असता त्याच्याकडे २.४0 लाखांचे तर १३ एप्रिल रोजी अंजुणा येथे अटक केलेला सेर्जिओ वास्तेव्ह या रशियनाकडे तब्बल ६.७0 लाखांचा कोकेन सापडला होता. एवढेच नव्हे तर ग्रिगोनी फोमेन्को (३२) व त्याची पत्नी व्हिक्टोरिया (२७) या दोघांनी कळंगूट येथे चक्क गांजाची शेती सुरु केली होती असेही उघडकीस आले होते.

- Advertisement -